14 आत्मसमर्पित माओवाद्यांची नसबंदी रिओपनींग शस्त्रक्रिया

-गडचिरोली पोलिस दलाचा पुढाकार - 14 आत्मसमर्पित माओवादी सदस्यांचे सर्वसामान्य कौंटुंबिक आयुष्य होणार सुखकर

    दिनांक :25-Mar-2026
Total Views |
गडचिरोली, 
reopening-of-sterilization-surgery : गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने आत्मसमर्पण केलेल्या माओवादी सदस्यांच्या पुनर्वसनासाठी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. या उपक्रमांच्या माध्यमातून त्यांना मुख्य प्रवाहात सामिल होणे सुलभ होण्यासाठी आरोग्य, प्रशिक्षण, रोजगार या विविध आयामांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून गडचिरोली पोलिस दल व सर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सर्च फाऊंडेशनचे दंतेश्‍वरी रुग्णालय चातगाव येथे ‘प्रोजेक्ट संजीवनी’ अंतर्गत 21 मार्च रोजी गडचिरोलीत आत्मसमर्पण केलेल्या 13 व गोंदिया जिल्ह्यात आत्मसमर्पण केलेल्या 1 अशा एकूण 14 आत्मसमर्पित माओवादी सदस्यांची नसबंदी रिओेपनींग शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांना काल 24 मार्च रोजी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
 

J  
 
माओवादी चळवळ सोडून मुख्य प्रवाहात सामील झालेल्या आत्मसमर्पितांना स्थिर व सुरक्षित कौंटुबिक जीवन जगता यावे, जे की त्यांना दलममध्ये कार्यरत असताना शक्य नव्हते, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला. संबंधित आत्मसमर्पित माओवाद्यांची आवश्यक वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर सुरक्षित वातावरणात शस्त्रक्रिया करण्यात आली. या उपक्रमासाठी गडचिरोली पोलिस दल व सर्च फाऊंडेशन यांच्यात समन्वय साधण्यात आला असून, सर्व आत्मसमर्पित माओवादी सदस्यांची शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली यशस्वीरित्या पार पडली. त्यामुळे संबंधित व्यक्तींसाठी सर्वसामान्य कौटुंबिक आयुष्य जगणे शक्य होऊन त्यांच्या भविष्यासाठी सकारात्मक पाऊल उचलले गेले आहे. या बदलामुळे त्यांचे कौटुंबिक आयुष्य व आरोग्यामध्ये सुधारणा होऊन त्यांच्या पुनर्वसनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्यात आला आहे.
 
 
सदर यशस्वी शस्त्रक्रिया सर्च फाऊंडेशन पद्मश्री डॉ. अभय बंग, पद्मश्री डॉ. राणी बंग, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली लीलावती रुग्णालय, मुंबई येथील डॉ. श्रीरंग पुरोहित, डॉ. सुशिल नेहेते, डॉ. लीना जैन, डॉ. वर्षा बारई, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोलीचे डॉ. नागसेन साखरे यांनी पार पाडल्या.
 
 
आतापर्यंत गडचिरोली पोललिस दलाच्या वतीने एकूण 50 आत्मसमर्पित माओवाद्यांची नसबंदी रिओपनिंग शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यापूर्वी नसबंदी रिओपनिंगची शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या एकूण 36 माओवादी सदस्यांपैकी एकूण 13 माओवादी सदस्यांना आतापर्यंत अपत्य प्राप्त झाले आहे. आत्मसमर्पित माओवादी सदस्यांसाठीचे चार स्वतंत्र व सुसज्ज रो-हाऊसचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.
 
 
72 आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना लॉएड्स मेटल्स अ‍ॅन्ड एनर्जी लिमिटेड येथे कौशल्य प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच गडचिरोली पोलिस दलाच्या प्रोजेक्ट संजीवनी अंतर्गत आत्मसमर्पणानंतर केंद्र व राज्य शासनाच्या योजनेंतर्गत मिळणा या बक्षीस रकमेचे सुलभ वितरण, भूखंड मिळवून देऊन प्रधानमंत्री आवास योजना व शबरी आवास योजना अंतर्गत गृहप्रकल्प उभारणे, आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशन कार्ड, जॉब कार्ड आदी ओळखपत्रे उपलब्ध करून देणे, स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण- मोटार ड्रायव्हिंग, शिवणकाम, ब्युटीपार्लर, पशुपालन रोजगार उपलब्ध झाले आहे. लॉयड्स मेटल्स अ‍ॅण्ड एनर्जी लि. सारख्या नामांकित कंपन्यांमध्ये वेल्डर, टेक्निशियन, ऑपरेटर आदी प्रशिक्षण व रोजगाराची संधी, महिलांच्या सक्षमिकरणासाठी महिला बचत गटांची स्थापना, वैद्यकीय मदत, डोळ्यांच्या उपचारासाठी ऑपरेशन रोशनी तसेच नसबंदी रिओपनिंग शस्त्रक्रिया, मानसिक व सामाजिक विकासासाठी समुपदेशन, मानसोपचार व ध्यान शिबिरे, आत्मसमर्पित माओवादी सदस्यांकरिता सामूहिक विवाह सोहळा व इतर योजनांची अंमलबजावणी केली जात आहे.