अमरावती,
solar-project : धारणी तालुक्यातील दिया येथील १० मेगावॅटचा सौर प्रकल्प कार्यान्वित झाल्याने, राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० , योजनेत जिल्ह्याने १०० मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचा टप्पा पूर्ण केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ३७ हजार ३५५ शेतकर्यांना दिवसा वीज मिळायला सुरूवात झाली आहे.
शेतकर्यांची दिवसा विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० या महत्वाकांक्षी योजनेत विकेंद्रीत स्वरूपाचे सौर प्रकल्प उभारून राज्यात १६ हजार मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येत आहे. अमरावती परिमंडळमध्ये मुख्य अभियंता अशोक साळुंके यांच्या मार्गदर्शनात आणि अधीक्षक अभियंता दिपक देवहाते यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला गती मिळाली आहे. अमरावती जिल्ह्यात या योजनेअंतर्गत ३२८ मेगावॅट वीज निर्मितीचे लक्ष असून २४ सौर प्रकल्प पूर्ण होऊन सुरू झाल्यामुळे जिल्ह्याची सौर ऊर्जा निर्मितीची क्षमता ११० मेगावॅट झाली आहे.
मेळघाटासारख्या दुर्गम क्षेत्रातील शेतकर्यांसाठी या योजनेचे महत्व अधिक असून धारणी तालुक्यात २६ मेगावॅट क्षमता असलेले ३ प्रकल्प सुरू झाले आहे. यामध्ये आज कार्यान्वित झालेला १० मेगावॅट क्षमता असलेला दिया येथे कढाव उपकेंद्रासाठी आणि डाबका उपकेंद्रासाठी ५ मेगावॅट तसेच कळमखार धारणी उपकेंद्रकरिता ११ मेगावॅट क्षमता असलेले असे दोन प्रकल्प याअगोदरच सुरू झाले आहे. त्यामुळे धारणी तालुक्यातील ८ वाहिन्यांवर असलेल्या ३१०९ शेतकर्यांना दिवसा वीज मिळत आहे.
दिया सौर प्रकल्पातून निर्माण होणारी वीज महावितरणच्या ३३ केव्ही कढाव उपकेंद्राला जोडण्यात आली आहे आणि या उपकेंद्राच्या माध्यमातून हरिसाल, दुणी आणि पाटिया या ११ केव्ही वाहिनीच्या माध्यमातून या वाहिनीवरील ११७४ शेतकर्यांना दिवसा आणि खात्रीशिर वीज पुरवठ्याची सोय झाली आहे. याअगोदर २० मार्चला मोर्शी विभागाअंतर्गत ३३ केव्ही बेनोडा उपकेंद्रासाठी ८ मेगावॅट क्षमता असलेला सौर प्रकल्प सुरू झाल्याने जिल्ह्याची वीज निर्मिती क्षमता ९२ मेगावॅट वरून १०० मेगावॅट झाली होती. त्यानंतर दिया या १० मेगावॅट सौर प्रकल्पामुळे जिल्याची सौर ऊर्जा निर्मिती क्षमता १० मेगावॅटने वाढून ११० झाली आहे. त्यामुळे दिया आणि बेनोडा या दोन सौर प्रकल्पामुळे दिवसा वीज मिळणार्या शेतकर्यात ४ हजार २४७ ने वाढ झाली असून ३७ हजार ३५५ झाली आहे. दिया सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प अचलपूर विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप अंधारे यांचे उपस्थितीत कार्यान्वित करण्यात आला. याप्रसंगी उपकार्यकारी अभियंता देवेंद्र चौधरी, धारणी उपविभाग व पुरुषोत्तम प्रोफाईल कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.