वॉशिंग्टन,
Trump's popularity declines इराणसोबत वाढलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या लोकप्रियतेत मोठी घसरण झाली. ताज्या सर्वेक्षणातून हे स्पष्ट झाले आहे. या सर्वेक्षणानुसार, केवळ ३६ टक्के नागरिक त्यांच्या कामकाजाबाबत समाधानी असल्याचे दिसून आले असून त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील ही आतापर्यंतची सर्वात कमी नोंद आहे. गेल्या आठवड्यात त्यांना मिळणारा पाठिंबा सुमारे ४० टक्क्यांवर होता, मात्र अवघ्या काही दिवसांतच तो ३६ टक्क्यांपर्यंत घसरला आहे.
इराणवर करण्यात आलेल्या हल्ल्यांमुळे आणि त्यानंतर वाढलेल्या इंधनदरांमुळे सामान्य नागरिकांमध्ये नाराजी वाढल्याचे दिसून येत आहे. या परिस्थितीचा थेट परिणाम त्यांच्या लोकप्रियतेवर झाला आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी मोठ्या संख्येने नागरिकांनी त्यांच्या कारभाराबद्दल असमाधान व्यक्त केले आहे. विशेषतः आर्थिक बाबतीत परिस्थिती अधिक चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. महागाई आणि वाढते दर यामुळे नागरिकांचा विश्वास डळमळीत झाल्याचे दिसून येत आहे. आर्थिक व्यवस्थापनाबाबतही त्यांना मिळणारा पाठिंबा लक्षणीयरीत्या कमी झाला आहे.
इराणविरोधातील कारवाईबाबतही जनमत विभागलेले दिसत असले तरी बहुसंख्य नागरिकांनी या हल्ल्यांना विरोध दर्शवला आहे. वाढत्या युद्धपरिस्थितीमुळे आणि त्यातून निर्माण झालेल्या आर्थिक परिणामांमुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वासमोर नवे आव्हान उभे राहिले असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. इराणसोबतचा संघर्ष, वाढती महागाई आणि इंधनदरांमुळे निर्माण झालेली परिस्थिती यांचा एकत्रित परिणाम म्हणून त्यांच्या लोकप्रियतेत मोठी घट झाली असून, पुढील काळात ही परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.