जिल्ह्यात उद्या रामजन्म अन् राम नामाचा गजर

*वर्धा, देवळीत शोभायात्रा, घोराड येथे रथयात्रा

    दिनांक :25-Mar-2026
Total Views |
वर्धा, 
ram-navami : रामनवमीचे औचित्य साधून जिल्ह्यात रामजन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमाने साजरा होणार आहे. येथील श्री राम मंदिर गोलबाजार व श्रीराम शोभायात्रा समितीच्या वतीने गुरुवार २६ रोजी दुपारी १२ वाजता श्रीरामजन्म व सायंकाळी शहरातून शोभायात्रा निघेल. देवळीत विविध झाँकी, नृत्य आणि नामघोष तर घोराड येथे रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, शहरात ठिकठिकाणी भगवे स्वागत गेट उभारण्यात आले आहे.
 

K 
 
 
 
श्रीराम मंदिर ट्रस्ट व श्रीराम शोभायात्रा समितीतर्फे वर्धा शहर तसेच ग्रामीण भागात रामनवमीनिमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती समितीचे संयोजक कमल कुलधरिया यांनी दिली. सायंकाळी ५ वाजता राम मंदिर गोल बाजार येथून शोभायात्रेला सुरूवात होईल. शोभायात्रा गोल बाजार, सराफ लाईन, बालाजी मंदिर, कपडा लाइन, पत्रावळी लाईन, अंबिका चौक, झेंडा चौक, शनी मंदिर चौक, सोशालिस्ट चौक, इंदिरा मार्केट, अष्टभुजा चौक, बढे चौक, श्रीराम दरबार चौक, दत्त मंदिर चौक व राम मंदिर येथे पोहोचून समारोप होईल. यावर्षीचे शोभायात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे खाटू श्यामजी झांकी तसेच वर्धेत प्रथमच लाइव्ह श्री श्याम भजन गायनाचा कार्यक्रम हे राहणार आहे. नागपूर येथील गायिका स्मिता गणूवाला तसेच श्याम पांडे व त्यांचे सहकारी भजन सादर करतील. श्रीराम युवा पथक, त्रिशूलधारी, गडचिरेाली येथील आदिवासी नृत्य, भगवान श्री जगन्नाथ यांचा रथ, इस्कॉन आंतरराष्ट्रीय संस्थेचे भजन मंडळ, विविध भजन मंडळी, श्री राम रथ, प्रभू श्रीराम पालखी यासह बॅण्ड पथकाचा सहभाग राहणार आहे. शोभायात्रेत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शोभायात्रा समितीचे अध्यक्ष अरूण काशीकर, श्रीराम मंदिर ट्रस्ट प्रमुख संजीव लाभे, सचिव विजय धाबे, राजेंद्र उमाटे, संयोजक कमल कुलधरिया, शिरीष जवदंड, मनोज पाचखेडे, राजेंद्र सोनी, विनोद भारद्वाज, प्रकाश परसोडकर, पवन परियाल, गणेश कावळे, सतीश कातरकर, मोहीत उमाटे, संतोष जोशी आदींनी केले आहे.
 
 
*घोराड येथे रथयात्रा
 
 
सेलू : विदर्भाची प्रतीपंढरी म्हणून ओळख असलेल्या तीर्थक्षेत्र घोराड येथे रामनवमी उत्सव सुरू असून गुरुवार २६ रोजी विठ्ठल-रुख्माई देवस्थानमध्ये श्रीराम जन्मोत्सव कार्यक्रम होईल. दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव, प्रमोद महाराज ठाकरे यांचे कीर्तन, रात्री ११ वाजता रथयात्रा निघणार असून गावातील दिंडी मार्गाने ही रथयात्रा पहाटेच्या सुमारास परिक्रमा पूर्ण करेल. पावणे दोनशे वर्षांपूर्वीचा असलेल्या लाकडी रथावर हनुमंताची मूर्ती विराजमान असते. या रथावर नक्षीने परिवारातील दोन सदस्य मशाल घेऊन असतात. २७ रोजी दुपारी काल्याचे कीर्तन, सायंकाळी ४ वाजता दहीहंडी कार्यक्रम गो माता मंदिरात होईल. पाच दिवस चालणार्‍या यात्रा महोत्सवात विदर्भातून भाविक आपली उपस्थिती लावणार आहेत.
 
 
*देवळीत झांकी, नृत्य आणि शोभायात्रा
 
 
देवळी : शहरात श्रीराम शोभायात्रा समितीच्या वतीने सायंकाळी ६ वाजता श्रीराम शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. राधा-कृष्ण मोरनी नृत्य, शिवतांडवाची थरारक प्रस्तुती, खाटूश्याम झांकी, बाहुबली हनुमान, माँ काली माता, श्रीराम दरबार तसेच नवदुर्गा दर्शनाच्या आकर्षक झांया या शोभायात्रेचे मुख्य आकर्षण ठरणार आहेत. विविध देवी देवतांचे देखावे, पारंपरिक वेशभूषा आणि ढोल-ताशांच्या गजरात घुमणारा श्रीरामचा नामघोष यामुळे वातावरण भारावून जाणार आहे. संपूर्ण मार्ग भगव्या पताका, फुलांची सजावट आणि आकर्षक रोषणाईने सजणार आहे. शोभायात्रेची सुरूवात श्रीराम मंदिर (मग्दे) येथून होऊन शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करणार आहे.
 
 
*रेहकीत शोभायात्रा
 
 
सेलू : तालुयातील रेहकी येथे श्रीराम जन्मोत्सव निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम असून गुरुवारी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गोपिका मातानगरी म्हणून ओळखले जाणार्‍या गावात सकाळी अभिषेक, दुपारी १२ वाजता जन्मोत्सव होणार असून राहुल महाराज हजारे यांचे कीर्तन होईल. सायंकाळी ६ वाजता शोभायात्रेला सुरूवात होणार असून सात दिवस हनुमान जयंतीपर्यंत कार्यक्रम चालणार आहे. भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन राम जन्मोत्सव समितीने केले आहे.
*पुलगाव : पुलगाव वर्धा नदीच्या काठावर वसलेल्या प्राचीन श्रीराम मंदिरात श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा होईल. सकाळी ५ वाजता वर्धा नदी वशिष्ठाश्रम श्रीराम मंदिरापासून प्रभात फेरी सुरू होईल. सकाळी १० वाजता स्टेशन चौकहून स्कूटर आणि कार रॅली निघेल. राम मंदिरात दुपारी १२ वाजता रामजींचा जन्मोत्सव साजरा होईल. सायंकाळी ६ वाजता राम मंदिरातून शोभायात्रा काढण्यात येईल. रात्री ८ वाजता स्टेशन चौक हनुमान मंदिर परिसरात महाआरती होईल.