सिंदीत जलवाहिनीला गळती; हजारो लिटर पाण्याची गंगा

*पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष

    दिनांक :25-Mar-2026
Total Views |
सिंदी (रेल्वे), 
water-pipeline-leak : कोट्यवधी रुपये खर्चून ११ किमीवरून आणलेल्या पाणी पुरवठा यंत्रणेच्या जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागली. त्यामुळे जलकुंभ विहित कालावधीत भरल्या जात नाही. परंतु, ५० वर्षांच्या या प्रकाराकडे पालिका प्रशासनाचे अजिबात लक्ष नाही. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा अकारण सामना करावा लागत आहे. ऐन उन्हाळ्यात या गळतीमुळे हजारो लिटर पाणी रस्त्याहून वाहते आहे.
 
 
 
 
J
 
 
 
सिंदी रेल्वे येथे दरवर्षीच उन्हाळ्यात पाणी समस्या उद्भवते. पण, ईच्छाशतीचा अभाव असलेल्या पदाधिकार्‍यांना त्याचे सोयरसुतक नाही. यावर्षी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक किमान या ज्वलंत प्रश्नाकडे लक्ष देतील, अशी अपेक्षा होती, पण, ती व्यर्थ गेली! नगर पालिका प्रशासनाने नळ जोडणीधारकांना आपल्या नळाला तोटी लावावी, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे फर्मान घंटागाड्यांवर असलेल्या लाऊडस्पिकरहून सोडले आहे. उन्हाळा जोमात सुरू असून २२ दिवस झाले. पण, त्या तोटी विरहित घरमालकांचा शोध लागला नाही. तसेच कोणतीही कारवाई केल्याचे दिसून येत नाही.
 
 
सध्या वाकसूर येथून आलेली नगर पालिकेची जलवाहिनी ठिकठिकाणी फुटल्याने पाणी गळती होऊन काही वार्डांत पाण्याचे अक्षरशः पाट वाहताना दिसतात. हजारो युसेस पिण्याच्या शुद्ध पाण्याचा दररोज अपव्यव होतो. मात्र, याकडे नप प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. एकीकडे जल हेच जीवन आहे, पाणी जपून वापरा, अशी दवंडी द्यायची आणि पाण्याच्या अपव्ययाबद्दल मौन बाळगायचे, असा दुतोंडी कारभार येथे सुरू आहे.
 
 
आजघडीला गृहिणींना चार दिवसाआड पाणी मिळते. त्यातही नळाला पाणी कधी येईल! याचा भरवसा नसतो. उन्हाळा दिवसागणिक कडक होत असून घरोघरी कूलर लागले. शिवाय घरांची बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे पाणी टंचाई उग्ररुप धारण करण्याची शयता आहे.
 
 
रविवारी सायंकाळी बस स्थानक ते पळसगाव चौरस्ता दरम्यान अनेक ठिकाणी गंगा वाहताना दिसली. यावेळी प्रभाग ४ आणि ६ मधील कुंभारपुरा भागातील ५० घरांना पाणीपुरवठा झालाच नाही. परिणामी, त्या भागातील नागरिकांनी प्रशासनाच्या नावाने शिमगा साजरा केला. हिच परिस्थिती कायम राहिल्यास पाणी पेटल्याशिवाय राहणार नाही आणि संतापलेली जनता पालिका कार्यालयावर धडकल्याशिवाय राहणार नाही, एवढे नकी.
 
 
नप प्रशासन मुबलक पाणी तर देत नाही. मात्र, पाणीपट्टी वसुलण्यात पुढे आहे. टिल्लूपंपने पाणी खेचून जनतेला नाईलाजाने गरज भागवावी लागते. गोरगरिबांना धनदांडग्यांचे पंप बंद झाले तरच चार-दोन हंडे पाणी मिळते. जीवन प्राधिकरणाने याकडे वेळीच लक्ष पुरवावे, अशी मागणी होत आहे.