IPL 2026: बीसीसीआयने केला उद्घाटन सोहळा रद्द, कारण...

    दिनांक :26-Mar-2026
Total Views |
बंगळुरू,
ipl-2026-opening-ceremony-cancelled : आयपीएलच्या १९ व्या हंगामाच्या सुरुवातीपूर्वी एक मोठे अपडेट समोर आले आहे. हा हंगाम २८ मार्च रोजी सुरू होणार आहे. मात्र, स्पर्धा सुरू होण्याच्या अवघ्या दोन दिवस आधी, बीसीसीआयने या हंगामात उद्घाटन सोहळा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने यावेळी उद्घाटन सोहळा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यापूर्वी कोणताही जल्लोष होणार नाही.
 
ipl
 
 
  
प्रत्येक हंगामात, आयपीएलच्या सलामीच्या सामन्यापूर्वी एक उद्घाटन सोहळा आयोजित केला जातो, ज्यामध्ये स्टार अभिनेते, गायक आणि नर्तक आपली कला सादर करतात. बोर्डाने यावेळी हा निर्णय का घेतला आहे, हे आपण जाणून घेऊया. २०२५ मध्ये, आरसीबी संघाने १७ वर्षांचा दुष्काळ संपवून आपले पहिले विजेतेपद पटकावले होते. हा विजय साजरा करण्यासाठी, आरसीबीने चिन्नास्वामी स्टेडियमवर एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. उत्सवादरम्यान, चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर चेंगराचेंगरी झाली.
 
या चेंगराचेंगरीत अकरा निष्पाप लोकांचा मृत्यू झाला, ज्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली. चेंगराचेंगरीत प्राण गमावलेल्या ११ जणांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, आरसीबीने उद्घाटन सामन्यापूर्वी एक मिनिटाचे मौन पाळण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच त्यांच्या स्मरणार्थ स्टेडियममधील ११ जागा रिकाम्या ठेवल्या जातील. वृत्तानुसार, याच घटनेमुळे बीसीसीआयने उद्घाटन सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी उद्घाटन सोहळा कोलकाता येथील ईडन गार्डन्समध्ये पार पडला होता.
आयपीएल २०२६ चा पहिला सामना बंगळूरु येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. २८ मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात याच मैदानावर सामना होईल. या हंगामात बंगळूर आपले विजेतेपद टिकवण्याचा प्रयत्न करेल, तर सनरायझर्स हैदराबाद आपल्या दुसऱ्या विजेतेपदावर नजर ठेवून असेल. आरसीबीने गेल्या हंगामात अंतिम सामन्यात पंजाब किंग्सला हरवून आपले पहिले विजेतेपद पटकावले होते.