ढाका,
Bus falls into river in Bangladesh बांगलादेशमध्ये एका भीषण अपघातात प्रवाशांनी भरलेली बस पद्मा नदीत कोसळल्याने किमान २३ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत, तर काही प्रवासी अद्याप बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. हा दुर्दैवी प्रकार राजबारी जिल्ह्यातील फेरी घाटाजवळ ही घटना घडल्याचे सांगितले जाते.
राजबारीहून ढाकाकडे निघालेल्या या बसमध्ये अंदाजे चाळीस ते पन्नास प्रवासी प्रवास करत होते. फेरीमध्ये चढण्याच्या प्रयत्नात असताना चालकाचा ताबा सुटल्याने बस थेट नदीत कोसळली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बस आधीच अत्यंत गर्दीने भरलेली होती आणि अनेक ठिकाणी थांबत प्रवासी घेत होती. अपघातानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. पोलीस, अग्निशमन दल, नौदल आणि स्थानिक मदत पथकांनी मिळून मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम हाती घेतली. रात्री अंधार वाढल्यामुळे काही काळ काम थांबवावे लागले, मात्र पहाटे पुन्हा पूर्ण क्षमतेने शोधकार्य सुरू करण्यात आले. आतापर्यंत २३ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, बेपत्ता प्रवाशांचा शोध अजूनही सुरू आहे.
दरम्यान, ‘हमजा’ या बचाव जहाजाच्या सहाय्याने सुमारे सहा तासांच्या प्रयत्नांनंतर पाण्यात बुडालेली बस बाहेर काढण्यात आली. रात्री उशिरा बसचा काही भाग पाण्यावर दिसू लागल्यानंतर क्रेनच्या मदतीने ती पूर्णपणे बाहेर काढण्यात आली. या अपघातातून थोडक्यात बचावलेल्या काही प्रवाशांनी हृदयद्रावक अनुभव सांगितले. एका प्रवाशाने पोहून किनाऱ्यावर पोहोचण्यात यश मिळवले, मात्र त्याच्या डोळ्यांसमोरच पत्नी आणि मुलगा पाण्यात बुडाल्याचे त्याने सांगितले. आणखी एका प्रवाशानेही स्वतःचा जीव वाचवला, परंतु त्याचे कुटुंबीय अद्याप बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आपल्या नातेवाईकांचा काही तरी पत्ता लागेल या आशेने अनेक कुटुंबीय नदीकिनारी जमा झाले होते. वातावरणात शोककळा पसरली असून बचाव पथकांकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून पुढील कार्यवाही सुरू आहे.