आयपीएलपूर्वी सीएसकेचा खुलासा; सलामीची जोडी ठरली

    दिनांक :26-Mar-2026
Total Views |
नवी दिल्ली,
CSK's statement before IPL आगामी आयपीएल २०२६पूर्वी संघांच्या हालचालींना वेग आला असून चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजी मांडणीबाबत मोठा खुलासा समोर आला आहे. संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने स्पष्ट केले की, आगामी हंगामात तो स्वतः आणि संजू सॅमसन हे दोघे सलामीला उतरतील.मुंबईत झालेल्या संघमालकांच्या बैठकीदरम्यान ही माहिती समोर आली. चेन्नई संघाने यंदा महत्त्वाची चाल खेळत रवींद्र जडेजा यांच्या बदल्यात सॅमसनला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. त्यामुळे संघाच्या फलंदाजीची ताकद अधिक वाढल्याचे मानले जात आहे.
 

sanju 
 
 
सॅमसनने अलीकडील टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत सलामीवीर म्हणून दमदार कामगिरी करत पाच सामन्यांत तीनशेहून अधिक धावा केल्या होत्या. या कामगिरीच्या जोरावर त्याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मानही मिळाला होता. त्यामुळे आता त्याच्याकडून आयपीएलमध्येही मोठ्या अपेक्षा व्यक्त होत आहेत.या निर्णयामुळे फलंदाजी क्रमात काही बदल होण्याची शक्यता आहे. आयुष म्हात्रे याला तिसऱ्या क्रमांकावर संधी मिळू शकते, तर उर्विल पटेल हाही त्या स्थानासाठी स्पर्धेत आहे. पुढील क्रमांकावर शिवम दुबे आणि देवाल्ड ब्रेविस यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
 
 
तसेच संघात नव्याने दाखल झालेल्या प्रशांत वीर याला पहिल्याच सामन्यात संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनुभवी एम. एस. धोनी हा मधल्या फळीत फलंदाजी करत संघाला स्थैर्य देईल, अशी अपेक्षा आहे. या बदलांमुळे चेन्नई सुपर किंग्सचा फलंदाजी क्रम अधिक मजबूत झाला असून आगामी हंगामात संघ दमदार कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.