मोठे थकबाकीदार मोकळे, छोट्यांवरच कारवाई
उमरखेड,
शहरात मार्च एंडिंगच्या पार्श्वभूमीवर Mahavitaran कडून थकबाकी वसुलीसाठी सुरू असलेल्या कारवाईत दुजाभाव होत असल्याचे चित्र समोर येत आहे. मोठ्या थकबाकीदारांकडे दुर्लक्ष करून व्यवसायी व सर्वसामान्य नागरिकांवरच वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. महावितरणचे पथक कोणतीही पूर्वसूचना न देता दुकाने, लहान उद्योग व घरगुती ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी काही हजार रुपयांच्या थकबाकीसाठीही थेट वीज कापली जात असल्याने छोट्या व्यवसायींचे मोठे नुकसान आहे. व्यवसाय ठप्प होऊन आर्थिक फटका बसत असल्याचे व्यापार्यांचे म्हणणे आहे.
Mahavitaran दुसरीकडे, लाखो रुपयांची थकबाकी असलेले मोठे उद्योग, संस्था किंवा प्रभावशाली ग्राहक मात्र कारवाईपासून वाचत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे मोठ्यांना सवलत, छोट्यांना शिक्षा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांचा प्रश्न आहे की, जर थकबाकी वसुली हीच उद्दिष्ट तर सर्व ग्राहकांवर समान निकष का लावले जात नाहीत ? वारंवार विनंती करूनही हप्त्यांची सुविधा किंवा मुदतवाढ नाकारली जात असल्याने सामान्य ग्राहक हवालदिल झाले आहेत. या संदर्भात महावितरणकडून मात्र थकबाकी वसुलीसाठी नियमानुसार कारवाई सुरू आहे असा दावा केला जात आहे. मात्र प्रत्यक्षात सुरू असलेली ‘निवडक कारवाई’ प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह करत आहे. मार्च एंडिंगच्या नावाखाली सुरू असलेल्या या कारवाईमुळे छोटे व्यवसायी व नागरिकांमध्ये असंतोष वाढत असून, यावर तत्काळ तोडगा काढण्याची मागणी जोर धरत आहे.
ग्राहकांना वेठीस धरण्याचा प्रकार
उमरखेड शहर अभियंत्यासह काही लाईनमन ग्राहकांना नाहक वेठीस धरून बिलाची तारीख येण्याअगोदरच बिल भरण्यासाठी तगादा लावत आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता विद्युत पुरवठा खंडित करण्याचा प्रकार कर्मचारी करत आहेत. या प्रकारामुळे ग्राहकांना मात्र याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्यामुळे वीज ग्राहकांमध्ये संताप आहे.