महाराष्ट्रात मराठी विषय अनिवार्य असावा : डॉ. माळोदे

    दिनांक :26-Mar-2026
Total Views |
ग्रंथोत्सवात मराठी भाषा संवर्धनावर परिसंवाद
 
वर्धा, 
Marathi language promotion महाराष्ट्रात राहणार्‍या प्रत्येकासाठी मराठी विषय अत्यावश्यक असला पाहिजे. केवळ दहावीपर्यंत नव्हे तर सर्व प्रकारच्या ज्ञानशाखांमध्ये पदवी अभ्यासक्रमापर्यंत मराठी हा विषय अनिवार्य करण्यात यावा, असे मत ज्येष्ठ समीक्षक डॉ. पुरुषोत्तम माळोदे यांनी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाद्वारे आयोजित ग्रंथोत्सवातील परिसंवादात काढले. स्थानिक बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयाच्या सभागृहात ‘मराठी भाषेच्या संवर्धनाच्या दिशा’ या विषयावर डॉ. पुरुषोत्तम माळोदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या परिसंवादात समीक्षक डॉ. वंदना पळसापुरे, साहित्यिक डॉ. प्रमोद नारायणे, डॉ. मेघा चुटे ब्राह्मणकर यांचा सहभाग होता.
 
 
marathi
 
डॉ. माळोदे पुढे म्हणाले, भाषेतूनच आपली संस्कृती प्रगट होत असल्याने मराठीतील प्रमुख कवी, लेखक, नाटककार, कादंबरीकार, विचारवंत यांची प्राथमिक ओळख आणि त्यांचे साहित्य विद्यार्थ्यांच्या अभ्यासात असले पाहिजे. तरच मराठी भाषेचे संवर्धन होईल. केवळ मराठी भाषा गौरव दिन साजरा करून किंवा साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सत्रात मराठी भाषेचा गौरव करून हे साध्य होणार नाही, असेही डॉ. माळोदे म्हणाले. इंग्रजी शाळांप्रमाणे मराठी शाळा अद्यावत करून विद्यार्थ्यांच्या निरीक्षण व आकलन शतीला चालना देणारी शिक्षण पद्धती रुजविण्याची गरज आहे. भाषा संवर्धनासाठी संवादातून भाषा जिवंत ठेवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. वंदना पळसापुरे यांनी केले. तर, मराठी भाषेसोबतच मराठी संस्कृतीचेही संवर्धन व्हायला हवे, असे मत डॉ. प्रमोद नारायणे यांनी मांडले. बोलीभाषा जगली तरच भाषा जगेल, असे सांगून डॉ. मेघा चुटे म्हणाल्या, भाषा संवर्धनासाठी प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. मराठी भाषा, संस्कृती आणि अन्य पूरक गोष्टी मुलांमध्ये रुजविण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे संचालन प्रा. निलेश बोबडे यांनी केले, तर आभार जिल्हा ग्रंथालय अधिकारी नितीन सोनोने यांनी मानले.
 
 
ग्रंथोत्सवात रंगले कविसंमेलन
Marathi language promotion  आशयसंपन्न कवितांमधून वैविध्यपूर्ण विचार प्रवाहाला सामावून घेणारे कविसंमेलन या ग्रंथोत्सवात सादर झाले. ज्येष्ठ कवी व गझलकार संजय इंगळे तिगावकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या काव्यसंमेलनात प्रशांत पनवेलकर, मुकुंद देशपांडे, जयश्री कोटगीरवार, मीनल रोहणकर, मंजूषा ठाकरे चौगावकर, अर्चना हरबुडे धानोरकर, निशा काळे, प्रा. अभिजित डाखोरे, प्रा. मनिषा रिठे, प्रा. अरूण हर्षबोधी आदींनी दर्जेदार कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. कविसंमेलनाचे निवेदन ज्योती भगत व पल्लवी पुरोहित यांनी केले. आभार ग्रंथोत्सव समितीचे सदस्य सुधीर गवळी यांनी मानले.