मुंबई
Nikhil Bane accident ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता निखिल बने याच्या बाईकचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. कोकणातील भटकंतीदरम्यान दापोली तालुक्यातील मंडणगडजवळील हिंमतगडावर जात असताना हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात निखिल किरकोळ जखमी झाला असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
निखिल बने सोशल मीडियावर सक्रिय असून तो आपल्या प्रवासाचे आणि दैनंदिन आयुष्यातील विविध क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असतो. काही दिवसांपूर्वीच त्याने नवी बाईक खरेदी केली होती. याच बाईकवरून तो कोकणातील निसर्गरम्य ठिकाणांची सफर करत होता. दरम्यान, हिंमतगडावर चढाई करत असताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्याचा अपघात झाला, अशी माहिती त्याने स्वतः सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमधून दिली आहे.अपघातानंतर परिसरातील स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीचा हात पुढे केला. जवळच खारी बटर विकणाऱ्या एका काकांनी तसेच गावातील काही महिलांनी निखिलला मदत करून त्याची विचारपूस केली. त्यांच्या या मदतीबद्दल निखिलने कृतज्ञता व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे, अपघातानंतरही Nikhil Bane accident निखिलने माघार घेतली नाही. किरकोळ दुखापत असूनही त्याने हिंमतगड गाठला आणि तेथील निसर्गसौंदर्याची झलक आपल्या व्हिडीओतून चाहत्यांना दाखवली. त्याच्या या धाडसाचे अनेकांनी कौतुक केले असून चाहत्यांसह काही सेलिब्रिटींनीही कमेंट करत त्याला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा निखिल बने सध्या अभिनयासोबतच भटकंतीचा छंदही जोपासताना दिसत आहे. मात्र, या अपघातानंतर त्याने अधिक काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.