कुवैतमध्ये सर्वोच्च नेत्यांच्या हत्येचा कट उधळला

    दिनांक :26-Mar-2026
Total Views |
कुवैत,
Plot to assassinate top leaders in Kuwait कुवैतमध्ये देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या हत्येचा कट रचल्याच्या संशयावरून सहा जणांना अटक करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कुवैती गृह मंत्रालयाने अधिकृत निवेदनातून ही कारवाई जाहीर केली असून, अटक करण्यात आलेले संशयित इराणच्या पाठिंब्याची हिजबुल्लाह या संघटनेशी संबंधित असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, या संशयितांनी आखाती देशातील प्रमुख नेत्यांना लक्ष्य करून हल्ल्याची योजना आखली होती. अटक करण्यात आलेल्या सहा जणांपैकी पाच जण हे कुवैतचे नागरिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणातील आणखी काही जण फरार असल्याचेही उघड झाले असून, त्यांची ओळख पटवण्यात आली आहे. या पळून गेलेल्या संशयितांमध्ये कुवैती, इराणी आणि लेबनीज नागरिकांचा समावेश असल्याचे समजते.
 
 
 leaders in Kuwait
 
चौकशीदरम्यान अटक केलेल्या व्यक्तींचा गुप्त हालचालींमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच त्यांनी हिजबुल्लाहशी संबंध असल्याची कबुली दिल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. देशाची सुरक्षितता आणि स्थैर्य धोक्यात आणण्याच्या उद्देशाने हा कट रचण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या सर्व संशयितांना पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी सरकारी यंत्रणांकडे सोपवण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणामागील इतर धागेदोरे शोधण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील संबंध उलगडण्यासाठी सुरक्षा यंत्रणा सखोल तपास करत आहेत. या घटनेनंतर कुवैतमध्ये सुरक्षा व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात कडक उपाययोजना करण्यात आल्या असून, संशयास्पद हालचालींवर काटेकोरपणे नजर ठेवली जात आहे.