पुणे
Pune Railway मध्य रेल्वे पुणे विभागाने प्रवाशांकडून खाद्यपदार्थ विक्रीत जास्त पैसे उकळणाऱ्या विक्रेत्यांविरोधात कठोर कारवाई केली आहे. एप्रिल २०२५ ते १२ मार्च २०२६ या ११ महिन्यांच्या कालावधीत प्रवाशांकडून जास्त दर आकारल्याच्या एकूण १२१ प्रकरणांची नोंद झाली होती. प्रशासनाने या प्रकरणांचा गांभीर्याने विचार करून संबंधित विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली असून, तब्बल ४ लाख ७५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
प्रवाशांकडून मिळालेल्या तक्रारींनुसार, चहा, पाणी, नाश्ता तसेच जेवणाच्या पदार्थांसाठी ठरवलेल्या छापील किमती (MRP) किंवा रेल्वे प्रशासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक पैसे आकारले जात होते. या तक्रारींवर लक्ष ठेवून रेल्वे प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम हाती घेतली. यामध्ये प्रत्येक स्थानकाच्या परिसरातील विक्रीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले.
रेल्वे विभागाने Pune Railway दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२६ महिन्यात सर्वाधिक १८ प्रकरणे नोंदली गेली आणि त्यावर ६५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. ऑक्टोबर २०२५ मध्येही १६ प्रकरणांमध्ये तब्बल ९६ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. या कारवाईमुळे विक्रेत्यांमध्ये धाक निर्माण झाला असून प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
मध्य रेल्वे पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी हेमंत कुमार बेहरा यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “प्रवाशांकडून जास्त पैसे आकारणे हा गंभीर नियमभंग असून अशा प्रकारच्या घटना अजिबात सहन केले जाणार नाहीत. प्रवाशांनी १३९ क्रमांकावर तक्रार नोंदवली तर तत्काळ कारवाई केली जाईल.”
जास्त दर आकारल्याच्या प्रकरणांतील दंडाची तपशीलवार यादी:
एप्रिल २५ – ४५,०००
मे २५ – ५३,०००
जून २५ – २८,०००
जुलै २५ – ५८,०००
ऑगस्ट २५ – ५१,०००
सप्टेंबर २५ – २५,०००
ऑक्टोबर २५ – ९६,०००
नोव्हेंबर २५ – ५,५००
डिसेंबर २५ – ११,०००
जानेवारी २६ – ३०,०००
फेब्रुवारी २६ – ६५,०००
१२ मार्च पर्यंत – ८,०००
एकूण दंड – ४,७५,५०० रुपये
या मोहिमेमुळे रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची आर्थिक पिळवणूक कमी होण्यास मदत झाली असून, भविष्यात अशा प्रकारच्या गैरव्यवहारावर प्रशासनाची सतत नजर राहणार आहे.