मुंबई,
ritu-tawde : मुंबईतील डबेवाल्यांच्या सेवेला बळ देण्यासाठी महापौर रितू तावडे यांनी महत्त्वाची घोषणा करत लवकरच १०५ ई-बाइक्स उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले. वांद्रे (पश्चिम) येथील ‘मुंबई डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्रा’च्या भेटीदरम्यान त्यांनी ही घोषणा केली. तसेच, शहरातील प्रस्तावित प्रवेशद्वारांपैकी एक प्रवेशद्वार डबेवाला संकल्पनेवर आधारित उभारण्याचाही मानस व्यक्त करण्यात आला.
या भेटीदरम्यान महापौरांनी डबेवाल्यांच्या कामकाजाची सविस्तर माहिती घेतली. ‘सॉर्टिंग’, ‘कोडिंग’ आणि वितरण प्रक्रियेतील अचूकता पाहून त्यांनी डबेवाल्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचे कौतुक केले. दररोज लाखो डबे वेळेत पोहोचवणारी ही सेवा केवळ अन्नपुरवठ्यापुरती मर्यादित नसून उत्कृष्ट व्यवस्थापन आणि शिस्तीचे जिवंत उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले.
डबेवाल्यांची सुमारे १३५ वर्षांची परंपरा आजही अखंडपणे सुरू असून मुंबईच्या कार्यसंस्कृतीचे ते प्रतीक मानले जातात. कोविडनंतर काही प्रमाणात संख्या कमी झाली असली तरी ही सेवा नव्या उर्जेने पुन्हा उभी राहत आहे. सध्या मुंबईत दररोज सुमारे एक लाख डबे वितरित केले जातात.
दरम्यान, अनुभव केंद्रात ‘वारसा प्रदर्शन’ आणि ‘व्हर्च्युअल रिअॅलिटी’द्वारे डबेवाल्यांचा इतिहास सादर केला जातो. या माध्यमातून त्यांच्या कार्यपद्धतीची माहिती पर्यटक आणि विद्यार्थ्यांना मिळते. या भेटीत विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डबेवाला संघटनेचे सदस्य दिनेश आरडे यांना आलेल्या हृदयविकाराच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली व प्रकृतीची विचारपूस केली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली.