पश्चिम नागपुरात अवतरली अवधपुरी

    दिनांक :26-Mar-2026
Total Views |
-प्रचंड उत्साहात शोभायात्रा
-रामनामाच्या जयघोषाने धरमपेठ, बजाजनगर दुमदुमले
-संपूर्ण परिसर भगवामय
 
किरण राजदेरकर 
नागपूर, 
‘जय श्रीराम’चा जयघोष करीत प्रचंड उत्साहात निघालेल्या Sriram Janmotsav Shobhayatra  श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रेने धरमपेठ, बजाजनगर, लक्ष्मीनगर परिसर गुरुवारी दुमदुमून गेला. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत गीत रामायण कानी पडत असल्यामुळे पश्चिम नागपूर जणू अवधपुरी झाली होती. पश्चिम नागपूर नागरिक संघातर्फे रामनगरातील राम मंदिरातून ही निघाली. सायंकाळी श्रीराम, सीता, लक्ष्मण व हनुमान मूर्ती, श्रीरामाच्या पादुकांचे पूजन व आरती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. विकास ठाकरे यांच्या हस्ते झाली.
 
 
aarati
 
प.ना. नागरिक संघाचे अध्यक्ष रवि वाघमारे, उपाध्यक्ष अ‍ॅड. राहुल पुराणिक, मुकुंद सरमुकदम, सचिव राजीव काळेले, सहसचिव अजय डबीर, वृषाली शिलेदार, अशोक गुजरकर, सहकोषाध्यक्ष श्रीराम सावरकर, अशोक आग्रे, नगरसेवक धनश्री देशपांडे, विनय दाणी, नरेश बरडे, सतीश डागोर, शोभायात्रा समितीच्या संयोजक शिवानी दाणी वखरे, कार्याध्यक्ष योगेश पाचपोर, आमंत्रक लोकेश आष्टनकर, अ‍ॅड. आनंद परचुरे तसेच डॉ. परिणिता फुके प्रामुख्याने उपस्थित होते.
 
 
पूजनानंतर सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी ‘रामललाके वास्ते खाली करो रास्ते’ असे पालखी खांद्यावर घेतली नि शोभायात्रेचा प्रारंभ झाला. अग्रभागी शिवाजी स्केटिंग क्लबचे भगवे फेटे घातलेले चिमुकले स्केटिंग करत होते. त्यानंतर दिव्यांची रोषणाई असलेले छत्र-चामरे घेऊन सेवेकरी चालत होते. शोभायात्रेचे पहिले स्वागत बाजीप्रभू चौकात फटाक्यांच्या आतषबाजीने झाले.
आकर्षक चित्ररथ, देखावे
Sriram Janmotsav Shobhayatra शोभायात्रेत सुमारे ३५ आकर्षक चित्ररथ होते. विशेष रोकडे ज्वेलर्सचा भव्य मनोहारी हनुमानद्वारा लंकिनी वध, शंकराद्वारे रामेश्वर पूजन, छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबार, अयोध्या धर्मध्वज रामलला मूर्ती, हनुमान शंखनाद करताना, कुंभकर्ण-लक्ष्मण युद्ध, विष्णू अवतार, रामाच्या लीला पाहताना कौसल्या माता, गंगा अवतरण, श्री गणेशद्वारा कुबेराचे गर्वहरण, राम-लक्ष्मण व रावण युद्ध, नृसिंह अवतार, लोंदे ज्वेलर्सतर्फे जय महाकाल हे चित्ररथ रामभक्तांचे लक्ष वेधून घेत होते. संदीप जोशी व आ. प्रवीण दटके यांच्यातर्फे दोन वेगवेगळे महाकाय बजरंगबली हे देखावे लहान-थोर सर्वांचेच आकर्षण ठरले.
 
 
इतर प्रसंगावरील विविध देवी-देवता खास करून जगदंबा माता, नंदीरूढ शंकर हे देखावे, विविध देवी-देवतांच्या वेशभुषेतील बालके, बाल व मोठा हनुमान हे सजीव देखावे, लाठी-काठी, ज्यूदो-कराटे प्रात्यक्षिक, सद्गुरू सिद्धारूढ अध्यात्म समिती भजन मंडळ, यंदाचे वैशिष्ट्य. यंदा प्रथमच तीन विशालकाय किंग काँग शोभायात्रेत चालत होते. ते पाहून विशेषतः लहान मुलांना मात्र भीती वाटत होती. हिंदू जनजागृती समितीतर्फे हिंदुत्व जागृती केली जात होती. भाजपा दिव्यांग आघाडीचे श्रीकांत भोगे यांनी ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांसाठी निःशुल्क बससेवा उपलब्ध करून दिली.
 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराजवळ विशाल मूर्ती लक्ष वेधून घेत होती. ठिकठिकाणी स्वागत द्वारे उभारण्यात आली होती. केतन विकास ठाकरे व अभ्यंकरनगर दुर्गा उत्सव मंडळातर्फे विद्युत रोषणाईचे स्वागत द्वार उभारण्यात आले होते. दिव्यांचे प्रकाशझोत असे होतेे की रस्त्यावर रांगोळी काढण्यात आल्याचा भास होत होता. शोभायात्रेच्या संपूर्ण मार्गावरआकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. शोभायात्रेचे पावलोपावली नागरिकांनी घेत स्वागत केले. विविध रंगाच्या माळा आणि चित्ररथांवरील आकर्षक दिव्यांमुळे संपूर्ण परिसर झळाळून गेला होता. धरमपेठ, बजाजनगर, लक्ष्मीनगर, अभ्यंकरनगर, गांधीनगर, रामनगर या संपूर्ण परिसरात भगवे झेंडे व पताका फडकत होत्या. मंदिराचे सर्व पदाधिकारी भगवे फेटे बांधून मंगलवेशात होते.
प्रचंड उत्साह
यंदा शोभायात्रेत सहभागी, पदाधिकारी, स्वयंसेवक व्यवस्थेत असलेल्या रामभक्तांचा उत्साह दिसत होता. शोभायात्रेचा मार्ग व त्यास येऊन मिळणारे रस्ते रामभक्तांच्या गर्दीने फुलून गेले होते. धरमपेठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे झेंडा चौकात नगरसेवक सुनील हिरणवार यांच्या हस्ते लस्सी वितरण करण्यात आले. शोभायात्रेच्या मार्गावर दर पावलांवर विविध संघटना, प्रतिष्ठाने, रामभक्त कुटुंब आदींतर्फे थंड पाणी, सरबत, ताक, लस्सी, पोहे, उसाचा रस, चणे, शिरा. केले जात होते.
शिस्त
यंदा Sriram Janmotsav Shobhayatra  शोभायात्रा आणि एकंदरितच व्यवस्थेत शिस्त दिसली. शोभायात्रा निघण्यापूर्वी चित्ररथ ठरलेल्या क‘मांकानुसार लावणे, रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांना शिस्तीत उभे करणे आदी कामे तरुण स्वयंसेवक करीत होते. खाद्य पदार्थ व पेय वितरणाचे स्टॉल्सही अगदी व्यवस्थित ठिकाणी लावण्यात आलेले दिसले. चंद्रशेखर घुशे, डॉ. दीपक खिरवडकर, अनिरुद्ध पालकर, प्रवीण महाजन, दिलीप धोटे, मुकुंद महाजन, किरण देवपुजारी, अनिल हस्तक, विशाल उमाळकर, मृणाल पुराणिक, अनुजा परचुरे, ओंकार पुराणिक, अनुश्री डबीर, अनघा पुराणिक, रिद्धी पुराणिक, अशोक केदार, दत्तात्रेय खरे, कल्पना पालकर, वृंदा महाजन, रश्मी वाघमारे, आदित्य काळेले, प्रसाद आष्टीकर, धवल पुराणिक, व इतर अनेक रामभक्तांनी परिश्रम घेतले.
शोभायात्रा मार्ग
निघालेली शोभायात्रा बाजीप्रभू चौक, लक्ष्मी भुवन चौक, कॉफी चौक, धरमपेठ सेंट्रल बाजार रोड, झेंडा चौक, लक्ष्मीनारायण मंदिर चौक, लक्ष्मी भुवन चौक, शंकरनगर चौक, बजाज नगर चौक, लक्ष्मीनगर अभ्यंकर चौक, व्हीएनआयटी चौक, एलएडी कॉलेज चौक, पुष्पलता तिडके चौक, हिल रोड मार्गे मध्यरात्रीच्या सुमारास राम मंदिरात परतली. अविरतपणे वहाणार्‍या चैतन्यमय आणि पवित्र गंगेसमान श्रीराम शोभायात्रेत लाखो रामभक्त भक्तीरसाने चिंब झाले.

कडेकोट बंदोबस्त
पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल, सहआयुक्त नवीनचंद्र रेड्डी व इतर वरिष्ठ अधिकार्‍यांसह इतर सर्व उपायुक्त, सहायक आयुक्त, अंबाझरी, सीताबर्डी व बजाजनगर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. वाहतूक पोलिसांना वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली. राज्य राखीव पोलिस जवानही होते. साध्या वेषातील शहर पोलिसांबरोबरच इतर गुप्तचर पथकांचे अधिकारी व जवान हालचालींवर नजर ठेवून होते.