होर्मुझ सामुद्रधुनी भारतासाठी खुली; इराणचा मोठा निर्णय

    दिनांक :26-Mar-2026
Total Views |
तेहरान,
Strait of Hormuz open to India इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत महत्त्वाचा निर्णय घेत भारतासह मित्र राष्ट्रांच्या जहाजांना या मार्गाने वाहतुकीस परवानगी दिल्याची घोषणा केली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी गुरुवारी ही माहिती दिली. या निर्णयामुळे जागतिक पातळीवरील तेल व खतांच्या पुरवठ्याला मोठा दिलासा मिळणार असल्याचे मानले जात आहे. मुंबईतील इराणी महावाणिज्य दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, भारताबरोबरच चीन, रशिया, इराक आणि पाकिस्तान या देशांच्या जहाजांनाही या सामुद्रधुनीतून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
 
 

Strait of Hormuz open to India 
 
आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या मार्गाच्या खुल्या होण्यामुळे वाहतुकीवरील अडथळे कमी होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्रसंघचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी नुकतेच होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्याचे आवाहन केले होते. दीर्घकाळ बंद राहिल्यामुळे तेल, वायू आणि खतांच्या वाहतुकीवर मोठा परिणाम होत असून जागतिक पेरणी हंगामावरही त्याचे गंभीर परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले होते.
 
 
पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर गुटेरेस यांनी युद्ध थांबवण्याचे आवाहन करत सर्व संबंधित देशांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला होता. नागरिकांचे वाढते हाल, आर्थिक अस्थिरता आणि जागतिक परिणाम लक्षात घेता तातडीने संघर्ष थांबवणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वीही इराणने शत्रू नसलेल्या देशांच्या जहाजांना या मार्गाने जाण्याची परवानगी देण्याचे संकेत दिले होते. आता या निर्णयाची औपचारिक घोषणा झाल्याने आंतरराष्ट्रीय व्यापार आणि पुरवठा साखळीला काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.