देशाच्या हवाई क्षेत्रात उत्तर प्रदेशची झेप!

    दिनांक :26-Mar-2026
Total Views |
लखनौ,
Uttar Pradesh in aviation sector उत्तर प्रदेशच्या विकास प्रवासात २८ मार्च २०२६ हा दिवस विशेष ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. या निमित्ताने राज्य हवाई वाहतुकीच्या क्षेत्रात नवा विक्रम प्रस्थापित करणार आहे. या विमानतळामुळे उत्तर प्रदेश देशातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विमानतळे असलेले पहिले राज्य ठरणार असून महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू आणि केरळ यांसारख्या राज्यांना मागे टाकणार आहे.
 

Uttar Pradesh in aviation sector 
 
 
सध्या राज्यात चार आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यरत आहेत आणि नोएडा येथील नवीन विमानतळ सुरू झाल्यानंतर ही संख्या पाचवर जाणार आहे. यामुळे राज्याच्या हवाई संपर्कात मोठी वाढ होणार असून आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडणी अधिक मजबूत होईल. २०१७ नंतर उत्तर प्रदेशात नागरी हवाई वाहतुकीच्या क्षेत्रात मोठे बदल घडून आले आहेत. त्या काळात राज्यात केवळ चार विमानतळ कार्यरत होते, मात्र आता सोळा विमानतळांवरून सेवा सुरू असून आणखी काही विमानतळांचे बांधकाम सुरू आहे. राज्य सरकारने या क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिल्याने पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
 
 
या नव्या विमानतळाच्या सुरूवातीमुळे पर्यटन, व्यापार आणि गुंतवणुकीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेषतः पश्चिम उत्तर प्रदेशात उद्योगधंद्यांना गती मिळून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. उद्घाटन सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली असून, हा कार्यक्रम ऐतिहासिक ठरेल असा दावा करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे उत्तर प्रदेश देशाच्या हवाई नकाशावर अधिक ठळकपणे उभा राहणार असून, विकासाच्या नव्या टप्प्याकडे राज्याची वाटचाल अधिक वेगाने होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.