घाटांचे लिलाव तरीही रेती चोरी सुरूच

*एक खुन झाला... तणाव कायम

    दिनांक :27-Mar-2026
Total Views |
वर्धा, 
sand-theft-case : जिल्ह्यातील ४२ रेती घाटांचा लिलाव झाला आहे. घाटांचा लिलाव घेतलेल्या एजन्सींना जिल्हा खनिकर्म विभागाकडून कार्यारंभ आदेशही देण्यात आले असले तरीही नदी पोखरून रेतीची अवैध वाहतूक केली जात आहे. तर ज्या रेती घाटांचा लिलाव झाला त्यापैकी काही रेती घाटांतून विना रॉयल्टी रेतीचा काळाबाजार केल्या जात आहे.
 
 
k
 
 
जिल्ह्यात महसुलचे वर्धा, हिंगणघाट व आर्वी हे तीन उपविभाग आहे. वर्धा उपविभागातील ११, आर्वी उपविभागातील १० तर हिंगणघाट उपविभागातील २१ रेती घाटांचा लिलाव करण्यात आला आहे. या रेती घाट लिलावातून मोठा महसूल जिल्हा प्रशासनाला मिळत असला तरी नदी पात्रांतून रेतीचा उपसा करणे पर्यावरणीय दृष्ट्या हितकारक नसल्याचे तज्ज्ञ सांगतात. रेतीचा उपसा करताना घाट लिलाव घेणार्‍या एजन्सीने पर्यावरण विषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे क्रमप्राप्त आहे. पण थेट मशीनींचा वापर करून रेतीचा उपसा केला जातो तर लिलाव झालेल्या घाटांतील रेती विना रॉयल्टी देत रेतीचा काळाबाजार केला जात आहे. एप्रिल २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत अवैध रेती वाहतुकीची २०५ प्रकरणे नोंदविण्यात आली. यात ४४ आरोपींना अटक करीत १२६ व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले. संबंधित व्यक्तींवर रेतीच्या अवैध वाहतुकीचा ठपका ठेवून तब्बल २ कोटी ३५ लाख ७ हजार ४९६ रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यापैकी १ कोटी ७६ लाख ४५ हजार २४६ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
 
 
वर्धा उपविभागात ११ रेती घाटांचा लिलाव झाला असून ४३,२७७ ब्रास रेतीची उचल करता येणार आहे. ११ मार्च २०२६ ला दिला कार्यारंभ आदेश चौरसिया कंस्ट्रशन या एजन्सीने घेतला. आर्वी उपविभागात १० रेती घाटांचा लिलाव झाला असून ३१८१६ ब्रास रेतीची उचल करता येणार आहे. ए. बी. कॅरिअर्स या एजन्सीला ६ फेब्रुवारी रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला.
 
 
हिंगणघाट उपविभागात २१ रेती घाटांचा लिलाव झाला असून ७५६४७ ब्रास रेतीची उचल करता येणार आहे. २२ जानेवारी रोजी चौरसिया कंस्ट्रशन पुलगाव या एजन्सीला कार्यारंभ आदेश लिलाव देण्यात आला. वर्धा जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासुन पावसाळा बगळता ९ महिने रेतीचा काळा बाजार चालतो. गेल्या महिन्यात पुलगाव येथील युवकाचा अवैध रेती विक्रीवरून झालेला वाद खुनापर्यंत पोहोचला आहे.