मुंबई
Dhurandhar 2 आजपर्यंत कोणत्याही बॉलिवूड चित्रपटाला जे जमलं नाही, ते आता रणवीर सिंहचा ‘धुरंधर 2’ हा चित्रपट कामगिरी करून दाखवत आहे. डिसेंबर 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’पेक्षा हा सीक्वेल बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करेल, अशी अपेक्षा होती. त्यापेक्षाही दमदार परफॉर्मन्स सध्या थिएटरमध्ये सुरू आहे. 19 मार्च रोजी हा चित्रपट जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला आणि त्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 18 एप्रिल रोजी पेड प्रीव्हूय आयोजित करण्यात आले होते. पेड प्रीव्हू आणि गेल्या सात दिवसांची कमाई मिळून ‘धुरंधर 2’ने सर्व रेकॉर्ड्स मोडून इतिहास रचला आहे. गुरुवारी संध्याकाळपर्यंत भारतात या चित्रपटाने 674.17 कोटी रुपयांचा गल्ला जमवला असून ग्रॉस कलेक्शनचा आकडा 805.32 कोटी रुपये इतका आहे. तर शुक्रवारपर्यंत देशभरात नेट कमाईचा आकडा 700 कोटी पार होणार असल्याचा अंदाज आहे.
‘धुरंधर 2’चे विक्रम
देशभरात या चित्रपटाचे सध्या Dhurandhar 2 14170 शोज आहेत. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’च्या हिंदी व्हर्जनने एका आठवड्यात 425 कोटी कमावले होते. तर सर्व सात भाषांमधील सात दिवसांची कमाई 688 कोटी रुपये झाली होती. रणवीरचा ‘धुरंधर 2’ शुक्रवारपर्यंत ‘पुष्पा 2’लाही मात देईल. प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यात एका भाषेत सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे. त्याचप्रमाणे बॉक्स ऑफिसवर अत्यंत जलद गतीने 1000 कोटींचा आकडा पार करण्याचा विक्रमही त्याने आपल्या नावावर केला आहे. याशिवाय पेड प्रीव्ह्यूमध्ये सर्वाधिक कमाई करणारा आणि भारतीय बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाईने ओपनिंग करणारा हिंदी चित्रपट.. असेही विक्रम ‘धुरंधर 2’च्या नावावर आहेत. हिंदीत एका दिवसात 100 कोटींचा गल्ला जमवणाराही ‘धुरंधर 2’ हा पहिला चित्रपट ठरला आहे.