श्रीनगर,
Raghunath Temple in Jammu श्रीनगरच्या हब्बा कदल भागातील प्राचीन रघुनाथ मंदिर ३६ वर्षांनंतर पुन्हा हिंदू भाविकांसाठी उघडले गेले आहे. रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर मंदिर खुले झाल्याने स्थानिक हिंदू कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मंदिर समितीने या निमित्ताने भव्य सोहळ्याचे आयोजन केले होते. झेलम नदीच्या काठावर हे मंदिर वसले आहे.३६ वर्षांनंतर मंदिरात मोठ्या थाटामाटात रामनवमी साजरी करण्यात आली. या मंदिराचे बांधकाम १८व्या शतकात महाराजा गुलाब सिंग यांनी केले होते.
परंपरेनुसार मुस्लिम घरांतून लाकूड व तांदूळ आणले
पूर्वी रामनवमीच्या दिवशी येथे भव्य उत्सव आणि मिरवणुका निघत असत. मात्र, १९९० मध्ये काश्मिरी पंडितांच्या निर्गमनानंतर मंदिर बंद करण्यात आले होते आणि तेव्हापासून बंदच राहिले. आता मंदिराचे नूतनीकरण केले असल्याने हिंदू समाजात उत्साहाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, स्थानिक मुस्लिम कुटुंबांनीही मंदिराच्या नूतनीकरणात महत्त्वपूर्ण योगदान दिले. पारंपरिक पद्धतीनुसार हवन आणि पूजा करण्यासाठी मुस्लिम घरांतून लाकूड व तांदूळ आणण्यात आले. भक्तांसाठी मंदिर पुन्हा उघडल्याबद्दल हिंदू कुटुंबांनी आनंद व्यक्त केला आणि काश्मिरी पंडितांचे पुनरागमन लवकरच होईल, अशी आशाही व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर जम्मूमध्ये रामनवमीच्या निमित्ताने भव्य मिरवणूक काढण्यात आली. भक्तांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि सण मोठ्या थाटामाटात साजरा झाला. याच वेळी, चैत्र नवरात्रीदरम्यान माता वैष्णो देवीच्या दर्शनासाठी कटरा बेस कॅम्पवर भक्तांची मोठी गर्दी दिसून आली. देशभरातून आलेल्या यात्रेकरूंमुळे कटरा बेस कॅम्पवर भक्ती आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.