गोंदिया,
scam-in-pujaritola-fisheries-institute : जिल्ह्यातील कोटरा येथील पुजारीटोला मत्स्यपालन सहकारी संस्थेत कोट्यवधींच्या घोटाळ्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, नॉयलान जाळे अनुदान वाटपाच्या नावाखाली तब्बल १ कोटी १७ लाख ९५ हजार ७२० रुपयांची अफरातफर झाल्याचे समोर आले आहे. यात दोषी संचालकांनी कागदोपत्री लाखो रुपयांचे अनुदान वाटप केल्याचे पुढे आले असताना त्याचे कोणतेही ठोस पुरावे, स्वाक्षरी किंवा प्रमाणित नोंदी उपलब्ध नसल्याचे प्राथमीक तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी सालेकसा पोलिसांनी ११ संचालकांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

संस्थेच्या नोंदीनुसार, मासेमार मजुरीसाठी ७० लाख ६१ हजार ७७० रुपये वाटप केल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र, या रकमेचा प्रत्यक्ष लाभ कोणाला झाला, याचा कोणताही ठोस मागोवा नाही. याशिवाय, ३४ लाख २३ हजार ९५० रुपयांच्या वाटपाबाबत तर कोणतीही कागदपत्रे किंवा खातेविवरण उपलब्ध नसल्याने हा घोटाळा आणखी गडद झाला आहे. इतकेच नव्हे तर, कर्मचार्यांना १२ लाख २५ हजार रुपये मानधन दिल्याचा दावा करण्यात आला असला तरी, त्यासंबंधित पुरावे देखील गायब आहेत. त्यामुळे संचालकांनी संगनमताने बनावट ताळेबंद तयार करून शासनाच्या निधीची मोठ्या प्रमाणावर लूट केल्याचा आरोप होत आहे.
याप्रकरणी राजेश केशवराव शहारे यांच्या तक्रारीवरून सालेकसा पोलिसांनी ११ संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला असून, आरोपी संचालकांमध्ये विनोद मंगरू कागदीमेश्राम, धनराज परसराम शेंडे, संजय कागदीमेश्राम, गुजोबा बारूक मेश्राम, आत्माराम भुते, देवेंद्र हरिश्चंद्र कोटांगले, भीमराज मरस्कोल्हे, प्रेमलाल मोतीराम मेश्राम, रघुनाथ बिसन मोरदेवे, पुरुषोत्तम चैतराम ढवरे व एक महिला संचालकाचा समावेश आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक भूषण बुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
कठोर कारवाईची मागणी
या कारवाईमुळे जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या प्रकारामुळे शासनाच्या अनुदान योजनांमध्ये पारदर्शकतेचा अभाव पुन्हा एकदा समोर आला आहे. दरम्यान, संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.