सेलू,
wife-murder : पत्नीपासून विभत राहणारा अक्षय चोरपगार (२७) रा. अमरावती सध्या मुक्काम मोर्चापूर याने पत्नी प्रणिता (२५) रा. दाताळ जि. अकोला हिचा गळा दाबून खून केल्याची घटना २५ मार्च रोजी उघडकीस आली. ही घटना २३ मार्चचे दुपारी २.३० ते रात्री ११ वाजताच्या दरम्यान सेलू शिवारात घडली. या प्रकरणी सेलू पोलिसांनी अक्षयला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणिता व अक्षय यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यांना दोन वर्षांचा मुलगा आहे. मात्र, वारंवार वाद होत असल्याने प्रणिता मुलासह माहेरी राहत होती. २३ रोजी अक्षयने पत्नीसोबत संपर्क साधून पुन्हा एकत्र राहण्याचे आमिष दाखवत कारने मोर्चापूरकडे घेऊन जात होता.
दरम्यान, सेलू परिसरात येताच दोघांत पुन्हा वाद झाला. या वादातून अक्षयने प्रणिताला मारहाण करून तिचा गळा दाबून खून केला. घटनेनंतर अक्षयने मृतदेह मध्यप्रदेशातील मोरवाडा येथील नदीपात्रात फेकून दिला. त्यानंतर मुलाला घेऊन नागपूर जिल्ह्यातील सोनेगाव पोलिस ठाण्यात पत्नी बेपत्ता असल्याची खोटी तक्रार दिली. दरम्यान, प्रणिताच्या मोबाईलवर संपर्क साधल्यावर संशयास्पद माहिती मिळाल्याने तिच्या भावाने व नातेवाईकांनी सेलू पोलिसांत धाव घेतली. ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांनी तत्काळ तपास सुरू करून अक्षयला चौकशीसाठी बोलावले. सुरुवातीला आरोपीने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस खाया दिसताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
यानंतर पोलिसांनी अक्षय व नातेवाईकांसह मध्यप्रदेशातील मोरवाडा येथे जाऊन तपास केला असता नदीपात्रात सापडलेला अज्ञात महिलेचा मृतदेह प्रणिताचाच असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी मृतकाच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून २६ रोजी सकाळी ६.३० वाजता गुन्हा नोंदवून अक्षयला अटक करण्यात आली.