मांडोदेवी देवस्थानात १९१ जोडपी विवाहबद्ध

- ३४ वा सर्वजातीय सामूहिक विवाह सोहळा थाटात - राज्यमंत्री अ‍ॅड. आशिष जायस्वाल यांची कुटूंबासह उपस्थिती

    दिनांक :28-Mar-2026
Total Views |
गोंदिया
Mandodevi Temple जिल्ह्यातील घनदाट जंगल आणि नैसर्गिक डोंगररांगा यांच्या कुशीत वसलेले गोरेगाव तालुक्यातील माँ मांडोबाई देवस्थान येथे रामनवमीच्या पर्वावर १९१ सर्वजातीय नवदांपत्यांनी माँ मांडोदेवीचे आशीर्वाद घेऊन नवीन वैवाहिक जीवनाची सुरुवात केली. २७ मार्च रोजी सायंकाळी हजारो भक्तांच्या उपस्थितीत हा सामूहिक विवाह सोहळा उत्साहाने पार पडला.
 
gondiya photo  
Mandodevi Temple  मांडोबाई देवस्थानातील हा सलग ३४ वा सर्वजातीय सामूहिक विवाह सोहळा असून नवदांपत्यांना आशीर्वाद देण्यासाठी राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन आणि कायदा-न्याय विभागाचे राज्यमंत्री अ‍ॅड. आशिष जायस्वाल कुटुंबासह उपस्थित होते.
यावेळी, देवस्थानचे अध्यक्ष तथा आमदार विनोद अग्रवाल, आमदार संजय पुराम, जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, माजी आमदार हेमंत पटले, खोमेश रहांगडाले, सहेसराम कोरोटे, पं.स. सभापती मुनेश रहांगडाले, कृउबास सभापती भाऊराव, उषा मेंढे, सुरेंद्र नायडू, दीपा चंद्रिकापुरे, सविता अग्रवाल, चेताली नागपुरे, सुमित भालोटिया, जीवनेश मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते. सामूहिक विवाह सोहळ्याबाबत माहिती देताना आ. अग्रवाल म्हणाले की, सर्वजातीय सामूहिक विवाहाची सुरुवात १९९३ पासून याच देवस्थानातून झाली आहे आणि हा सलग ३४ वा वर्ष आहे. आजच्या काळात हा उपक्रम समाजातील अनेक कुटुंबांचा वेळ आणि खर्च वाचवणारा प्रभावी उपक्रम ठरत आहे. दरवर्षी जोडप्यांची वाढती संख्या ही आयोजन समितीच्या उत्कृष्ट व्यवस्थापनाची साक्ष देत असल्याचे ते म्हणाले. तर आगामी काळात सर्व धर्मीय लोकांनी या उपक्रमांतर्गत विवाह नोंदणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले. प्रसंगी राज्यमंत्री अ‍ॅड. आशिष जायसवाल यांनी माँ मांडोदेवीला नमन करून नवदांपत्यांना आशीर्वाद दिले. यावेळी त्यांनी लवकरच संपूर्ण क्षेत्राची पाहणी करून येथे कोणते विकासकामे करता येतील याचा आढावा घेऊन निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. प्रसंगी नवदांपत्यांना आवश्यक जीवनोपयोगी वस्तू, वस्त्र, तसेच सोन्याचे मंगलसूत्र प्रदान करण्यात आले. Mandodevi Temple कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवस्थानाचे सचिव जि. प. सभापती डॉ. लक्ष्मण भगत, उपाध्यक्ष भैयालाल सिंदराम, कोषाध्यक्ष विश्वनाथ असाटी, सहसचिव कुशन घासले, डॉ. जितेंद्र मेंढे, शालिकराम उईके, सखाराम सिंदराम, दिलीप खंडेलवाल, राहुल अग्रवाल, नंदकिशोर गौतम, तसेच मंदिराचे पुजारी पंडित अयोध्यादास महाराज, किशोर शेंडे, अमोल भारती आदींनी सहकार्य केले. मंगलाष्टक नारायण बहेकार यांनी गायन केले.