मुंबई
Aakhri Sawal teaser release बॉलिवूडमधील बहुप्रतिक्षित ठरलेल्या ‘आखरी सवाल’ या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अभिनेता संजय दत्त यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची निर्मिती निर्माते निखिल नंदा यांनी केली आहे. अलीकडेच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख १५ मे २०२६ जाहीर करण्यात आली असून, आता त्याच्या टीझरचीही अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
निर्मात्यांनी राम नवमीच्या निमित्ताने एक खास पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत टीझरच्या रिलीजची माहिती दिली. या घोषणेनुसार, ‘आखरी सवाल’चा टीझर हनुमान जयंतीच्या शुभमुहूर्तावर, म्हणजेच २ एप्रिल रोजी सकाळी ११:११ वाजता प्रदर्शित करण्यात येणार आहे. या वेळेची निवडही खास असल्याचे मानले जात असून, धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेल्या दिवशी टीझर रिलीज करून प्रेक्षकांमध्ये वेगळीच उत्सुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.या चित्रपटात संजय दत्त यांच्यासह अमित साध, नमाशी चक्रवर्ती, समीरा रेड्डी, त्रिधा चौधरी आणि नीतू चंद्रा यांसारखी दमदार कलाकारांची फळी पाहायला मिळणार आहे. विविध भूमिका आणि कथानकाच्या वैशिष्ट्यांमुळे हा चित्रपट चर्चेत आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, त्यांच्या दिग्दर्शनशैलीमुळे चित्रपटाकडून अपेक्षा अधिक वाढल्या आहेत.फर्स्ट-लूक पोस्टरला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर आता टीझरकडूनही मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.