जिल्हाधिकारी विकास मीना यांचे आवाहन
यवतमाळ,
Abundant fuel reserves: Vikas Meena मध्यपूर्व आशिया, आणि युरोपियन खंडातील सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन तुटवड्याच्या अफवा पसरत असताना, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना दिलासा देणारी माहिती दिली आहे. जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, सीएनजी तसेच एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून त्याचा नियमित व सुरळीत पुरवठा सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात कार्यरत असलेल्या भारत हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल या तीनही कंपन्यांकडून इंधन साठा पुरेसा असल्याची खात्री देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि ऑईल कंपन्या समन्वयाने काम करत असून पेट्रोल-डिझेलचा साठा अबाधित ठेवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगण्यात आले.
Abundant fuel reserves: Vikas Meena शुक‘वार, २७ मार्चच्या अहवालानुसार, जिल्ह्यात एकूण ६७५ किलोलिटर पेट्रोल आणि ८०९ किलोलिटर डिझेल साठा आहे. तसेच ४७५ किलोलिटर पेट्रोल आणि ११०० किलोलिटर डिझेल साठा वाहतुकीत (इन ट्रान्झिट) आहे. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. इंधनाचा पुरवठा सुरळीत सुरू राहणार असल्याने घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कंपनीनिहाय साठा
हिंदुस्थान पेट्रोलियम १८८ किलोलिटर, डिझेल २५१ किलोलिटर, (इन ट्रान्झिट पेट्रोल १७५ किलोलिटर, डिझेल ३१० किलोलिटर), भारत पेट्रोलियम १७० किलोलिटर, डिझेल २८० किलोलिटर, (इन ट्रान्झिट पेट्रोल १५० किलोलिटर, डिझेल ४०० किलोलिटर), इंडियन ऑईल ३१७ किलोलिटर, डिझेल २७८ किलोलिटर, (इन ट्रान्झिट पेट्रोल १५० किलो लिटर, डिझेल ३९० किलोलिटर).