ई-गव्हर्नन्समध्ये उल्लेखनीय कामगिरी
अमरावती,
Amravati Municipal Commissioner शासनाच्या मुख्यमंत्री १५० दिवस ई-गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरीबद्दल अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा - चांडक यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते सह्याद्री सभागृह, मुंबई येथे आयोजित समारंभात गौरव करण्यात आला. राज्यस्तरीय मूल्यमापनात अमरावती महानगरपालिकेने २९ महानगरपालिकांमधून २०० पैकी १७९.५० गुण मिळवत पाचवा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, विदर्भ व मराठवाडा विभागातून या मानाच्या यादीत स्थान मिळवणारी अमरावती महानगरपालिका ही एकमेव संस्था ठरली आहे. आयुक्त सौम्या शर्मा - चांडक यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या तंत्रज्ञानाधारित, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख उपक्रमांमुळे ही कामगिरी शक्य झाली आहे. मर्यादित संसाधनांमध्येही मोठ्या महानगरपालिकांशी स्पर्धा करत मिळवलेले हे यश विशेष उल्लेखनीय मानले जात आहे.
Amravati Municipal Commissioner महानगरपालिकेने राबविलेल्या प्रमुख उपक्रमांमध्ये माय अमरावती व्हॉट्सअॅप चॅटबॉट, चॅनेल व मोबाईल अॅपद्वारे नागरिकांशी सुलभ संवाद, रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानावर आधारित कूल रूफ उपनियम २०२५, शासकीय प्रक्रिया पुनर्रचना अंतर्गत सेवांचे डिजिटायझेशन व नवीन वेब पोर्टल्सची निर्मिती, ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे परवाने व प्रमाणपत्रांची पडताळणी तसेच मालमत्ता करासह विविध विभागांमध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यांचा समावेश आहे. अमरावती महानगरपालिकेची ही कामगिरी राज्यातील तंत्रज्ञानाधारित व उत्तरदायी शहरी प्रशासनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानली जात असून, भविष्यातील स्मार्ट प्रशासनासाठी मार्गदर्शक ठरणार आहे.