मुंबई,
Ashok Kharat controversy भोंदू बाबा अशोक खरातच्या कृष्णकृत्यांची झळ आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांना बसू लागली असून, एकमेकांच्या नेत्यांना सहआरोपी करण्याची मागणी राकाँ च्या शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून करण्यात येत आहे.या आरोप-प्रत्यारोपांमुळे सिन्नरच्या या भोंदूचे राजकीय धागेदोरे नक्की कुठे आणि कुणापर्यंत पोहोचले आहेत, यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी रूपाली चाकणकर आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी केली आहे. केवळ राजीनामा देऊन पाप धुतले जात नाही. चाकणकर आणि तटकरे हे सतत या भोंदूबाबा खरातच्या संपर्कात होते. विशेष म्हणजे, आमदार माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद मिळू नये म्हणून खरातने तटकरेंकडे फिल्डिंग लावली होती का? याचा खुलासा झालाच पाहिजे, असा खळबळजनक आरोप लवांडे यांनी केला.
आधी जयंत पाटलांना आत टाका!
लवांडे यांच्या आरोपांना अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. दुसèयाचे बघायचे वाकून, ही शरद पवार गटाची जुनी प्रवृत्ती आहे, असा टोला लगावत त्यांनी थेट जयंत पाटलांचे नाव घेतले. भोंदू खरातच्या ट्रस्टला पाणी मिळाले तेव्हा जलसंपदा मंत्री जयंत पाटील होते. त्यांचे खरातसोबतचे असंख्य फोटो आणि भेटींचे पुरावे उपलब्ध आहेत. जर कुणाला सहआरोपी करायचे असेल, तर सर्वांत आधी जयंत पाटलांना करा, अशी मागणी परांजपे यांनी केली. तसेच, विकास लवांडे हे रोहित पवारांच्या सांगण्यावरून वळवळ करत असल्याची खोचक टीकाही त्यांनी केली.
अशोक खरात विरोधात महायुती सरकार कठोर पावले उचलत असून, स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यावर लक्ष ठेवून आहेत. रूपाली चाकणकर यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले असले, तरी विरोधकांनी या प्रकरणाचे भांडवल करत सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दुसरीकडे, जुन्या काळातील कनेक्शन काढून सत्ताधाèयांनी विरोधकांनाच आरोपीच्या पिंजèयात खेचले आहे.
आता एसआयटीच्या तपासात नक्की कोणत्या नेत्याचे नाव अधिकृतरीत्या समोर येते आणि खरातला अभय देणारा तो राज्यातील अत्यंत मोठा नेता नेमका कोण, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत आणि राकाँच्या दोन्ही गटांत यावरून कलगीतुरा रंगू लागला आहे.