आयपीएलपूर्वी चेन्नईला धक्का; धोनी मैदानाबाहेर!

    दिनांक :28-Mar-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Chennai suffer shock before IPL इंडियन प्रीमियर लीग २०२६ चा हंगाम सुरू होण्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्सला संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा अनुभवी खेळाडू एम.एस. धोनी दुखापतीमुळे स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यात मैदानाबाहेर राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पोटरीच्या त्रासामुळे तो अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नसल्याची माहिती समोर आली आहे. संघ व्यवस्थापनाने याबाबत अधिकृत माहिती देताना सांगितले की, धोनी सध्या पुनर्वसन प्रक्रियेत असून स्पर्धेच्या पहिल्या दोन आठवड्यांत तो उपलब्ध राहणार नाही. त्यामुळे सुरुवातीच्या सामन्यांमध्ये संघाला त्याच्या अनुभवाचा लाभ मिळणार नाही. . चेन्नईचा पहिला सामना ३० मार्च रोजी गुवाहाटीमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार आहे.
 
 

धोनी 
 
धोनीच्या अनुपस्थितीत संघाच्या संघरचनेत बदल अपेक्षित असून यष्टीरक्षणाची जबाबदारी आता संजू सॅमसन याच्याकडे जाण्याची शक्यता आहे. यासोबतच फलंदाजीची सुरुवात करण्याची जबाबदारीही त्याच्यावर सोपवली जाऊ शकते. तर ऋतुराज गायकवाड संघाचे नेतृत्व करत असून संघाची मांडणी नव्या स्वरूपात दिसण्याची शक्यता आहे. उर्विल पटेल हा देखील एक पर्याय म्हणून संघात आहे, मात्र त्याची भूमिका नेमकी काय असेल हे सामन्यांदरम्यान स्पष्ट होईल. गेल्या काही वर्षांपासून धोनीला दुखापतींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः गुडघ्याच्या समस्येमुळे त्याला अनेक वेळा त्रास झाला असून त्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. तरीही त्याचा त्रास पूर्णपणे कमी झालेला नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच तो अलीकडील काळात फलंदाजीसाठी उशिरा येताना दिसतो. आता नव्या हंगामाच्या सुरुवातीलाच त्याच्या अनुपस्थितीमुळे संघासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.