गोंदिया जिल्ह्यातील ८८ लाभार्थ्यांनी घेतला लाभ
- ६७.५० लाखांची आर्थिक मदत
गोंदिया,
Chief Minister's Relief Fund 'Devdoot' मुख्यमंत्री सहाय्यता निधी रुग्णांसाठी ‘देवदूत’ ठरले असून गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. यात१ मे २०२५ ते २७ मार्च २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील ८८ लाभार्थ्यांना ६७ लाख ५० हजार रुपये इतकी आर्थिक मदत देण्यात आली आहे. राज्यातील गरजू रुग्णांना गंभीर आजारांच्या उपचारासाठी आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यरत आहे. नैसर्गिक आपत्ती, मोठे अपघात तसेच विविध गंभीर आजारांवरील उपचारांसाठी या निधीतून तातडीने आर्थिक सहाय्य दिले जाते. तसेच राज्यातील नोंदणीकृत रुग्णालयांमध्ये उपचार घेणार्या आणि इतर शासकीय आरोग्य योजनांचा लाभ मिळू न शकणार्या गरीब रुग्णांनाही या योजनेचा लाभ दिला जातो.
Chief Minister's Relief Fund 'Devdoot' या योजनेअंतर्गत कर्करोग, हृदयरोग, अवयव प्रत्यारोपण, अस्थिमज्जा प्रत्यारोपण, डायलिसिस, मेंदूचे आजार, जळीत रुग्ण तसेच इतर गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते. विशेष म्हणजे, पूर्वी या निधीकरीता अर्ज करण्यासाठी नागरिकांना मुंबई येथे जावे लागत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना वेळ आणि खर्चाचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. दरम्यान, नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेत राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने १ मे २०२५ पासून स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष कार्यरत करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून रुग्णांना अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे व उपचारासाठी आर्थिक मदतीबाबत मार्गदर्शन केले जात आहे. त्यामुळे नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्यात सुलभता आली आहे.
कोण करु शकते अर्ज...
या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी रुग्णांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १.६० लाख रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे. अर्जासोबत विहित नमुन्यातील अर्ज, आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, वैद्यकीय खर्चाचे अंदाजपत्रक तसेच संबंधित आजाराची वैद्यकीय कागदपत्रे सादर करणे आवश्यक असते. तसेच अपघातग्रस्त लाभार्थ्यांचा एम.एल.सी. रिपोर्ट (मेडिकल लिगल केस) असणे अनिवार्य आहे.
...