हतबल उद्धव ठाकरे

    दिनांक :28-Mar-2026
Total Views |

uddhav thackeray महाराष्ट्राच्या विशेषतः मुंबईच्या राजकारणात एकेकाळी निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या शिवसेनेला सध्या अनेक आघाड्यांवर आव्हानांचा सामना करावा लागत आहे. पक्षांतर्गत असंतोष आणि मोठ्या नेत्यांमधील वाद यामुळे हा गट एका कडीण टप्प्यातून जात असल्याचे चित्र आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची धुरा सांभाळली; मात्र गेल्या काही वर्षांतील घडामोडींनी पक्षाचे भवितव्य अनिश्चिततेच्या गर्तेत ढकलले आहे.


uddhav thackeray 
 
 
 
ठाकरे गटातील अंतर्गत अस्वस्थता अलिकडच्या काळात अधिकच स्पष्ट झाली आहे. विशेषतः आदित्य ठाकरे आणि पक्षाचे मुखपत्र ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यातील वाद सध्या चर्चेचा विषय बनला आहे. ठाकरे गटाच्या खासदारांच्या बैठकीत हा वाद विकोपाला गेल्याचे वृत्त आहे. राज्यसभेच्या एका जागेसाठी संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव सुचवल्याने आदित्य ठाकरे संतप्त झाले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे यांनी राऊतांना थेट इशारा दिला की, ‘2028 ला तुम्ही खासदार म्हणून दिसणार नाहीत.’ सोशल मीडियामध्ये तर या बैठकीत ‘हायव्होल्टेज ड्रामा’ झाल्याचे आणि आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांची कॉलर पकडल्याचे दावे केले आहेत. खरे-खोटे माहीत नाही; पण तणाव प्रचंड वाढला आहे एवढे निश्चित. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनीही या घटनेचा उल्लेख केला आहे. या घटनेमुळे ठाकरे गटातील निर्णय प्रक्रियेवर आणि नेतृत्वावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात आणि पक्षाच्या धोरणात्मक निर्णयात त्यांचा महत्त्वाचा सहभाग असतो. अशा परिस्थितीत आदित्य ठाकरे यांच्यासारख्या युवा नेत्याने राऊतांना दिलेला इशारा हा पक्षातील वाढत्या मतभेदांचे द्योतक आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर राबवून उबाठा गट फोडणार असल्याच्या चर्चेने उबाठा गटात अस्वस्थता आहे. उबाठा नेत्यांचे म्हणणे आहे की, उद्धव ठाकरे प्रकृतीमुळे महाराष्ट्राचा दौरा करू शकत नाहीत, पण आदित्य ठाकरे तरुण आणि सशक्त आहेत; मग ते का बाहेर पडत नाहीत? खरं तर या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे. आदित्य ठाकरेंना वाटतं की, शिवसेना ही त्यांची खाजगी कंपनी आहे, जी आजोबांनी उभारली होती आणि आता वारसा हक्काने ते कंपनीचे मालक आहेत. बाकीचे नेते नोकर आहेत. कार्यकर्त्यांबद्दल त्यांच्या मनात कोणती भावना असेल, याची कल्पनाही करवत नाही. मग नोकर मालकांसाठी झटणार की मालक नोकरांसाठी झटणार? उद्धव ठाकरेंचा स्वभाव कोणालाही न भेटण्याचा आहे. याचा समाचार नीलिमा गोऱ्हे यांनी घेतला आहे. उद्धव ठाकरे कामे करत नाहीत, कोणाला भेटत नाहीत हे त्यांच्यापासून दूर गेलेले आणि आता दूर जाऊ पाहणारे सगळेच लोक म्हणत आहेत. विशेष म्हणजे पक्ष फुटल्यानंतरही त्यांनी त्यांच्या कार्यात बदल केलेला नाही, ही खंतही गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे.
राज्यसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर प्रियांका चतुर्वेदी यांची नाराजीही समोर आली आहे. चतुर्वेदी या ठाकरे गटाकडून राज्यसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक होत्या; मात्र संजय राऊत यांनी शरद पवार यांचे नाव सुचवल्याने त्यांची संधी हुकली. संजय राऊत यांनी यावर स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, ठाकरे गटाकडे पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे प्रियांका चतुर्वेदी यांना पुन्हा उमेदवारी देणे शक्य नव्हते आणि महाविकास आघाडीतील समन्वयासाठी शरद पवार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. या घटनेमुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधील जागावाटपाचा गुंता आणि ठाकरे गटातील नेत्यांच्या अपेक्षांचा संघर्ष समोर आला. तसेच, महाविकास आघाडीतील प्रत्येक घटक पक्षाला आपल्या नेत्यांना संधी देण्याची इच्छा असल्याने भविष्यातही अशा प्रकारचे वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उद्धव ठाकरे यांच्या राजकीय प्रवासात देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे त्यांचे संबंध नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहेत. 2017 च्या मुंबई महानगर पालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा स्वतंत्रपणे लढले होते. या निवडणुकीत शिवसेनेला 84 जागा मिळाल्या होत्या, तर भाजपाने 82 जागा जिंकून शिवसेनेला कडवी टक्कर दिली होती. त्यावेळी भाजपाने काही अपक्षांच्या मदतीने मुंबई महानगर पालिकेत सत्ता स्थापन करणे सहज शक्य होते. तसेही देवेंद्र फडणवीस संख्याशास्त्राचे जादूगार आहेत. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबतचा आदर आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबतची मैत्री जपण्यासाठी पालिकेवर दावा ठोकला नाही आणि मुंबई महानगर पालिकेची सत्ता ठाकरेंकडेच राहू दिली. या घटनेचा उल्लेख अनेकदा फडणवीस यांनी केला आहे की, त्यांनी त्यावेळी ‘मोठे मन’ दाखवले होते. मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपासोबतची युती तोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन केली आणि मुख्यमंत्रिपद स्वीकारले. त्यांनी भाजपाचा ‘विश्वासघात’ केला आणि फडणवीस यांचासारखा सच्चा मित्र गमावला. फडणवीस हे यारो के यार म्हणून ओळखले जातात. मित्राच्या चुका पोटात घालणारे, त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणारे फडणवीस उद्धव ठाकरेंना सांभाळून घेत होते. परंतु मुख्यमंत्रिपदाच्या लालसेपोटी त्यांनी चांगला मित्र गमावला आणि पुढे पक्षही गमावला. संजय राऊत, जे जनतेतून कधीच निवडून येऊ शकत नाही, ज्यांना कोणताच जनाधार नाही, जे सतत बोलत असतात, शिव्या घालत असतात, अशांना उद्धव ठाकरेंनी चाणक्य बनवल्यावर पक्षाची वाताहत होणारच होती.
आजच्या घडीला उद्धव ठाकरे गट एका मोठ्या राजकीय संकटातून जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोरीमुळे पक्षाला मोठे खिंडार पडले, पक्षाचे नाव आणि चिन्हही गमवावे लागले. यामुळे उद्धव ठाकरे यांची राजकीय ताकद मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. देवेंद्र फडणवीस सध्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. याउलट, उद्धव ठाकरे यांच्याकडे सध्या कोणतेही महत्त्वाचे पद नाही. ही परिस्थिती ठाकरे पिता-पुत्राने स्वतःच निर्माण केली आहे, अशी टीका विरोधकांकडून सातत्याने केली जाते. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी व हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेना उभी केली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी केल्याने त्यांच्या पारंपरिक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. बाळासाहेबांचा वारसा संपुष्टात आणल्याचा आरोपही त्यांच्यावर केला जातो. पक्षातील अंतर्गत वादामुळे कार्यकर्त्यांमध्येही अस्वस्थता वाढली आहे. शिंदे ‘ऑपरेशन टायगर’ करणार अशा चर्चांमुळे ठाकरे गटातील नेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. उद्धव ठाकरे हतबल आहेत; मात्र या हतबलतेचं श्रेय पूर्णपणे त्यांनाच दिले पाहिजे. असो!

जयेश शत्रुघ्न मेस्त्री