१.१३ लाखांचा ऐवज लंपास
बुलढाणा,
Dongarkhandal house burglary तालुयातील डोंगरखंडाळा येथे मध्यरात्री घडलेल्या घरफोडीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. अंगणात झोपलेल्या महिलेच्या नाकातील सोन्याची नथ चोरट्यांनी काढून नेल्याची धक्कादायक बाब समोर आली असून, त्यानंतर घरात प्रवेश करून रोख रक्कमही लंपास करण्यात आली. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी अनीता गोविंदा पवार (रा. डोंगरखंडाळा) यांनी बुलढाणा ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, त्या व त्यांचे पती गोविंदा पवार हे २५ मार्च रोजी घराबाहेर अंगणात झोपले होते. घर टीनपत्र्याचे असल्याने उकाडा वाढल्याने त्यांनी बाहेर झोपण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, २६ मार्च रोजी मध्यरात्रीनंतर सुमारे १ वाजताच्या सुमारास त्यांना जवळून कोणीतरी गेल्याचा भास झाला.
Dongarkhandal house burglary त्या जाग्या झाल्या असता, अंधारात दोन अज्ञात इसम पळून जात असल्याचे दिसले; मात्र प्रकाशाचा अभाव आणि झोपेची गुंगी, यामुळे त्यांची ओळख पटू शकली नाही. त्यांच्या नाकातील ५ ग्रॅम वजनाची सोन्याची नथ (अंदाजे किंमत ३५ हजार रुपये) चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. पुढे घराची पाहणी केली असता, घराचे दार उघडे आढळले. घरातील लोखंडी पेटी उघडून त्यातील रोकडही चोरट्यांनी लंपास केली होती. हरभरा विक्रीतून मिळालेली ७८ हजार रुपयांची रक्कम स्टीलच्या डब्यात ठेवली होती, तीही चोरीस गेली. घटनेची माहिती मिळताच त्यांनी मुलगा दिलीप पवार याला फोन करून बोलावले. त्यानंतर कुटुंबीयांनी परिसरात शोध घेतला मात्र चोरट्यांचा कोणताही माग लागला नाही. अखेर त्यांनी बुलढाणा ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. या घटनेत एकूण १ लाख १३ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची नोंद असून, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस करीत आहेत.