नवी दिल्ली,
Dope test mandatory before marriage देशात विवाहपूर्व तपासणीबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. याबाबत आम आदमी पक्षाचे खासदार मालविंदर सिंग कांग यांनी संसदेत केंद्र सरकारकडे महत्त्वाची मागणी केली आहे. विवाहाच्या आधी मुलांची अमली पदार्थ चाचणी आणि आरोग्य तपासणी सक्तीची करण्यासाठी कायदा आणावा, अशी भूमिका मांडली. कांग यांनी सांगितले की, सध्या समाजात घटस्फोटांचे प्रमाण वाढत आहे तसेच कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनाही वाढताना दिसत आहेत. नवीन नातेसंबंध जुळवताना मुलीची सखोल चौकशी केली जाते, मात्र मुलाच्या बाबतीत तितकी काळजी घेतली जात नाही. लग्नाच्या वेळी अनेक महत्त्वाच्या गोष्टी लपवल्या जातात, ज्याचा परिणाम पुढे गंभीर स्वरूपात समोर येतो, असे त्यांनी नमूद केले.

या संदर्भात त्यांनी सामाजिक माध्यमांवरही आपली भूमिका स्पष्ट केली. देशातील अनेक महिला, भगिनी आणि माता शांतपणे वेदना सहन करत आहेत, त्यांचा आवाज बनण्याचा प्रयत्न आपण करत आहोत, असे त्यांनी म्हटले. विवाहानंतर अमली पदार्थांचे व्यसन, गंभीर आजार किंवा गुन्हेगारी प्रवृत्ती उघडकीस येत असल्याने अनेक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. त्यांच्या मते, वधूच्या शिक्षणापासून ते तिच्या पार्श्वभूमीपर्यंत सर्व बाबींची तपासणी केली जाते, पण वराच्या बाबतीत दुर्लक्ष केले जाते, ही दुटप्पी पद्धत थांबली पाहिजे. त्यामुळे विवाह नोंदणीपूर्वी प्रत्येक वराची अमली पदार्थ चाचणी आणि वैद्यकीय तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी तातडीने कायदा करावा, अशी मागणी त्यांनी केली. ही संकल्पना राबवली गेल्यास महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि वैवाहिक जीवनाच्या स्थैर्यासाठी मोठे पाऊल ठरेल, असा त्यांचा विश्वास आहे. या मागणीमुळे आता देशभरात विवाहपूर्व तपासणी अनिवार्य करण्याबाबत नवी चर्चा रंगू लागली आहे.