मोदी-ट्रम्प यांच्या संभाषणाचे 'ते' वृत्त भारताने फेटाळले

    दिनांक :28-Mar-2026
Total Views |
नवी दिल्ली,
India rejects Modi-Trump news मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात २४ मार्च रोजी दूरध्वनीवर चर्चा झाली. या चर्चेत पश्चिम आशियातील परिस्थिती, सुरक्षा आणि शांतता राखण्याच्या प्रयत्नांवर विचारांची देवाणघेवाण झाली, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. याआधी एका अमेरिकन वृत्तपत्राने असा दावा केला होता की, या दूरध्वनी संभाषणात उद्योगपती एलॉन मस्क देखील उपस्थित होते. परंतु भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने हा दावा फेटाळून लावला असून तो दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट केले आहे.
 
 
 
Trump news
 
मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, २४ मार्चच्या चर्चेत फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा सहभाग होता; कोणताही तिसरा पक्ष यात सहभागी नव्हता. मंत्रालयाने पुढे म्हटले की, भारत आणि अमेरिका यांच्यातील सामरिक भागीदारी सातत्याने मजबूत होत आहे आणि दोन्ही देश जागतिक तसेच प्रादेशिक मुद्द्यांवर नियमितपणे संवाद साधतात. पश्चिम आशियासारख्या संवेदनशील प्रदेशात स्थिरता आणि शांतता सुनिश्चित करणे ही दोन्ही देशांची प्राथमिकता आहे.