भारतीय शास्त्रज्ञांनी शोधली ब्रह्मांड मापनाची नवी पद्धत

शिअर रेशिओ भूमितीय चाचणी यशस्वी

    दिनांक :28-Mar-2026
Total Views |
पुणे,
Indian astronomers ब्रह्मांडाची रचना उलगडण्यासाठी दीर्घिकांचे अचूक स्थान आणि आकार माहीत असणे आवश्यक आहे. मात्र, अवकाशातील इतर दीर्घिकांच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीपर्यंत पोहोचणारा प्रकाश वक्र झालेला असतो. परिणामी, ब्रह्मांडाचे अचूक मापन करता येत नाही. यावर भारतीय शास्त्रज्ञांनी भूमितीय चाचणीचा उपाय सुचवला असून, विश्वाचे सर्वेक्षण करणाèया महाकाय प्रकल्पांमध्ये याचा वापर होणार आहे.
 

Indian astronomers, universe measurement 
आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी संस्थेच्या (आयुका) संशोधकांनी ब्रह्मांडाच्या अचूक मोजमापासाठी ‘शिअर रेशिओ’ नावाची अभिनव भूमितीय चाचणी शोधली आहे. नेदरलँडमधील लाईडन विद्यापीठातील संशोधक आणि आयुकाचे माजी विद्यार्थी डॉ. दिव्य राणा व आयुकाचे प्रा. डॉ. सुहृद मोरे यांचे हे संशोधन ‘फिजिकल रिव्ह्यू डी’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.
दूरवरच्या दीर्घिकांपासून येणारा प्रकाश वाटेत असलेल्या इतर दीर्घिकांच्या गुरुत्वाकर्षणामुळे वाकतो, ज्याला शास्त्रज्ञ ‘ग्रॅविटेशनल लेन्सिंग’ म्हणतात. या प्रकाशाच्या वलनावरून विश्वातील कृष्णपदार्थांचे (डार्क मॅटर) नकाशे तयार केले जातात. यासाठी विश्वाच्या प्रसरणामुळे प्रकाश किती ताणला गेला आहे, याचे मोजमाप अर्थात रेडशिफ्ट अचूक असणे आवश्यक असते. मात्र, प्रत्येक आकाशगंगेचा रेडशिफ्ट मोजणे वेळखाऊ असल्याने शास्त्रज्ञ रंगांवरून त्याचा अंदाज लावतात, ज्यात अनेकदा त्रुटी राहतात. या नवीन पद्धतीत केवळ एकाच अंतरावरील दीर्घिका न पाहता, वेगवेगळ्या अंतरावर असलेल्या दीर्घिकांच्या प्रकाशावर होणाèया गुरुत्वाकर्षणाच्या परिणामांची तुलना (रेशिओ) केली जाते. यामुळे वायू, तारे आणि दीर्घिकांच्या निर्मितीतील गुंतागुंतीचे अडथळे दूर होतात आणि विश्वाच्या भूमितीचे शुद्ध मोजमाप मिळते.
संशोधनाचे महत्त्व
- ही भूमितीय चाचणी एखाद्या कॉस्मिक रूलर (वैश्विक मोजपट्टी) सारखे काम करते, ज्यामुळे वायू, तारे आणि दीर्घिकांच्या निर्मितीशी संबंधित अडथळे दूर होऊन विश्वाच्या भूमितीचे अचूक मोजमाप मिळते.
- संशोधकांनी ‘सुबारू हायपर सुप्रिम-कॅम’ या अवकाश सर्वेक्षणातील माहितीचा संसोधनासाठी वापर केला.
- वेरा सी. रुबिन, रोमन स्पेस टेलिस्कोप आणि युक्लिड यासारख्या अवकाशीय दुर्बिणींद्वारे कोट्यवधी दीर्घिकांचे नकाशे तयार करणार आहेत. या मोहिमांना अचूक डेटा पुरवण्यासाठी हे तंत्र अत्यंत मोलाचे ठरणार आहे.
‘‘भविष्यातील मोठ्या खगोलशास्त्रीय सर्वेक्षणांमध्ये रेडशिफ्टमधील अनिश्चितता ही एक मोठी अडचण ठरू शकते. अशा वेळी ‘शिअर रेशिओ’ पद्धत ही मोजमापांच्या पडताळणीसाठी एक प्रभावी आणि स्वतंत्र साधन ठरेल.’’
प्रा. सुहृद मोरे, संशोधक, आयुका