शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावा

    दिनांक :28-Mar-2026
Total Views |
नागरी संघर्ष समितीचे नपं प्रशासनाला स्मरणपत्र
 
कारंजा (घा.), 
Install CCTV cameras: Demand शहरात सार्वजनिक ठिकाणी व मुख्य रस्त्यावर सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे, अशा मागणीचे स्मरणपत्र कारंजा नगरपंचायत प्रशासनाला स्थानिक नागरी समस्या संघर्ष समितीने दिले. यापूर्वी ऑटोबर २०२५ मध्ये याच मागणीचे निवेदन नागरी समितीने दिले होते, हे उल्लेखनिय!
 
 
cctv
 
बर्‍याचदा घरफोडी, चोरी, वाहतूक नियमांचे उल्लंघन व इतर गुन्हेगारी घटना घडून येतात. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बस स्थानक, गोळीबार चौक, मुख्य मार्केट रोड, पंचायत समिती चौक, मॉडेल हायस्कूल पुढील परिसर व मॉडेल महाविद्यालयापुढील बोगदा, जयस्तंभ चौक, कृषी उत्पन्न बाजार समिती चौक, सर्व शाळा, महाविद्यालय परिसर, मुख्य रस्ते व चौक येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास अशा घटनांवर नियंत्रण ठेवता येईल. तसेच कायदा व सुव्यवस्थेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करता येईल. पोलिसांना गुन्हेगारीचा तपास करायलाही सोयीचे होईल, असे निवेदनात म्हटले आहे. शहरातील प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची कारवाई करावी, असे नागरी समस्या संघर्ष समितीने स्मरण पत्रात प्रशासकीय अधिकारी शालू डोंगरे यांना दिले. निवेदन देताना नागरी संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
 
 
ठराव घेतला... निधी नाही...
Install CCTV cameras: Demand  शहरात काही महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासंबंधीचा ठराव नगरपंचायतने घेतलेला आहे. त्याकरिता निधी उपलब्ध झाल्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसण्याची कारवाई करता येईल, अशी प्रतिक्रीया प्रशासकीय अधिकारी शालू डोंगरे यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली.