पुणे
Pune police recruitment death शहरातील पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान एका तरुण उमेदवाराचा धावताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर घडली. या घटनेमुळे भरती प्रक्रियेवर शोककळा पसरली असून उमेदवारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत तरुणाचे नाव पुरुषोत्तम बारकुल (वय २३, रा. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) असे असून तो पोलीस दलात भरती होण्याच्या उद्देशाने पुण्यात आला होता. गेल्या महिनाभरापासून पुणे शहर पोलीस दलाची भरती प्रक्रिया सुरू असून शिवाजीनगर येथील मैदानावर मैदानी चाचण्या घेतल्या जात आहेत. शनिवारी सकाळी १६०० मीटर धावण्याची चाचणी सुरू असताना बारकुल यानेही उत्साहाने सहभाग घेतला. त्याने सुरुवातीच्या दोन फेऱ्या यशस्वीपणे पूर्ण केल्या; मात्र तिसऱ्या फेरीत धावत असताना अचानक त्याला झटका आला आणि तो मैदानावरच कोसळला. उपस्थित उमेदवारांनी आणि अधिकाऱ्यांनी तातडीने त्याच्याकडे धाव घेतली.
मैदानावर तैनात असलेल्या Pune police recruitment death वैद्यकीय पथकाने त्याची प्राथमिक तपासणी केली असता त्याच्या हृदयाचे ठोके मंद झाल्याचे आढळले. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन त्याला तात्काळ ससून रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पुरुषोत्तम बारकुल हा अत्यंत साध्या कुटुंबातील असून पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्याने मेहनत घेतली होती. त्याच्या अचानक मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून घटनेची माहिती मिळताच त्याचे नातेवाईक पुण्याकडे रवाना झाले आहेत.दरम्यान, १६०० मीटर धावण्याची चाचणी ही पोलीस भरतीतील अत्यंत कठीण टप्पा मानला जातो. या घटनेनंतर भरती प्रक्रियेत वैद्यकीय सुविधा आणि सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केले जात असून प्रशासनाकडून पुढील चौकशी केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे खाकी वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या एका तरुणाचे आयुष्य अकाली संपले असून राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.