जीवनाचे अनेक सार रामायणात

    दिनांक :28-Mar-2026
Total Views |
विवेक घळसासी यांचे प्रतिपादन
तीन दिवसीय ‘रामस्मरण व्याख्यानमाला’
 
नागपूर, 
‘ramasmaraṇ vyakhyanmala’ रामायण हे केवळ महाकाव्य नसून आदर्श जीवन जगण्याची कला शिकवणारा मौलिक ग्रंथ होय. प्रभू रामचंद्रांचे जीवन त्याग, कर्तव्य, संयम आणि धर्माचे पालन करण्याची शिकवण आपणास रामायणातून मिळते. प्रभू श्रीरामांनी रामायणात केवळ कथा सांगितल्या नाहीत, तर जीवनाचे अनेक सार सांगितले असल्याचे स्पष्ट प्रतिपादन प्रसिध्द प्रवचनकार विवेक घळसासी यांनी केले.
 
 
ram
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्यासह कलासंगम, कला व सांस्कृतिक मंडळ आणि केशवनगर सांस्कृतिक सभा यांच्या संयुक्त विद्यमाने महर्षी व्यास सभागृह, डॉ. हेडगेवार स्मारक परिसर, रेशीमबाग येथे आयोजित स्व. सुनील देवउपाध्ये स्मृती तीन दिवसीय ‘रामस्मरण व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनपाचे सांस्कृतिक व क्रीडा अधिकारी पियूष आंबुलकर, कलासंगमचे अध्यक्ष आकरे, रवी ढोके, केशवनगर सांस्कृतिक सभेचे सदस्य सुनील काशीकर, प्रकाश देशपांडे यांची उपस्थिती होती.
 
श्रीरामाच्या भक्तीचे चार मार्ग
व्याख्यानमालेचे पहिले पुष्प प्रवचनकार विवेक घळसासी यांनी ‘रामायणातील भेटीगाठी’ या विषयावर मार्गदर्शन करताना पुढे सांगितले की, रामायणातील निषादराज गुह, केवट, माता शबरी आणि वीर हनुमान यांच्या श्रीरामाशी झालेल्या गाठीभेटींच्या प्रसंगातून मैत्री, समर्पण आणि धैय या चार मूल्यांमधून श्रीरामाशी जोडण्याचा मार्ग मिळतो. श्रीरामाच्या भक्तीचे चार मार्ग असून आपल्या अस्तित्वाची परमोच्च अवस्था गाठण्यासाठी भक्ती हा सर्वात सुलभ आणि सुखद मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीरामांच्या संवादांमध्ये मानवी मूल्यांचा गाभा
कौटुंबिक नातेसंबंध, मैत्री आणि संकटात स्थिर राहण्याची प्रेरणा आपणास रामायणातून मिळते. आजच्या आधुनिक काळातही हा अत्यंत उपयुक्त असा ग्रंथ होय. केवळ श्रीरामाची आरती आणि भजन यापुरतेच रामचरित्र मर्यादित नाही. तर समाजातील उपेक्षित घटकांशी श्रीरामांच्या संवादांमध्ये मानवी मूल्यांचा गाभा दडलेला आहे. श्रीरामाच्या प्रत्येक गाठीभेटीतून समाजजागृतीचा संदेश मिळतो.

रामाचा आदर्श सांगण्याची आवश्यकता
अध्यक्षीय भाषणात पियूष आंबुलकर म्हणाले की, नव्या पिढीला प्रभू श्रीराम समजावून सांगण्याची गरज युवकांवर चांगले संस्कार होण्यासाठी रामाचा आदर्श सांगण्याची आवश्यकता आहे. नवयुवकांचे जीवन दिशाहीन होण्यापासून वाचविण्यासाठी श्रीराम चरित्र सांगण्याची गरज आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला केशवनगर सरस्वती शिशु मंदिराच्या बालकांनी रामस्मरण गीत सादर करून वातावरण भक्तिमय केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश एदलाबादकर आदींनी परिश्रम घेतले.
आज शरद पोंक्षे यांचे व्याख्यान
व्याख्यानमालेच्या दुसर्‍या दिवशी, २९ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता, अभिनेते व वक्ते शरद पोंक्षे यांचे ‘भारत एक हिंदुराष्ट्र’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थायी समिती अध्यक्षा शिवानी दाणी-वखरे राहणार आहेत.