पाटसमध्ये बंदची हाक : जय मल्हार क्रांती संघटना आक्रमक

    दिनांक :29-Mar-2026
Total Views |
पाटस
Patas bandh news दौंड तालुक्यातील पाटस येथे मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभारलेल्या आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या स्मारक स्तंभावरील विद्युत रोषणाईयुक्त फलकाची अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करून तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी (दि. २८) रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडल्याचा आरोप जय मल्हार क्रांती संघटनेने केला असून, यामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 

Patas bandh news 
प्राथमिक माहितीनुसार, पाटस येथील मुख्य प्रवेशद्वाराजवळील जुना बाजारतळ परिसरातील क्रांतीस्तंभावर लावण्यात आलेला इलेक्ट्रॉनिक फलक तसेच जय मल्हार क्रांती संघटनेच्या नावाचा फलक अज्ञातांनी दगडफेक करून फोडला. शनिवारी सकाळी ही बाब संघटनेचे तालुका अध्यक्ष सोमनाथ खोमणे यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर संघटनेचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब गाडेकर आणि पोलिस हवालदार जालिंदर बंडगर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली; मात्र संबंधित प्रकार कोणत्याही कॅमेऱ्यात कैद न झाल्याने तपासात अडथळे निर्माण झाले आहेत.
 
 
दरम्यान, या घटनेच्या Patas bandh news निषेधार्थ जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने तसेच ग्रामस्थांच्या सहभागाने पाटस पोलिस चौकीवर मुक मोर्चा काढण्यात आला. संघटनेचे नेते बापूसाहेब खोमणे, तालुका अध्यक्ष दादासाहेब खोमणे, उपसरपंच बाबा कोळेकर आणि पंचायत समिती सदस्य शिवाजी ढमाले यांच्यासह ग्रामस्थांनी पोलिसांना निवेदन देत महापुरुषांची विटंबना करणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी पोलिसांनी घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर जय मल्हार क्रांती संघटनेने रविवारी (दि. २९) पाटस बंदची हाक दिली होती. या बंदला ग्रामस्थांकडून प्रतिसाद मिळाल्याचेही समजते.दरम्यान, पाटस ग्रामपंचायतीने मुख्य रस्ते आणि चौकांमध्ये बसवलेले अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. कॅमेरे कार्यरत नसल्यामुळे अशा घटनांचा तपास करणे पोलिसांसाठीही कठीण ठरत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने तातडीने हे कॅमेरे दुरुस्त करून कार्यान्वित करावेत, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.