- बनावट व्यक्ती उभी करून दस्त नोंदणी
- एका महिलेसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
गोंदिया,
Banavat Land Registry Peper येथील सह-दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी झालेल्या दस्त क्रमांक २२४१/२०२५ प्रकरणात मृत महिलेच्या नावाने बनावट व्यक्ती उभी करून शेतजमिनीची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सह-दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचारी अविनाश यशवंत जाधव (५३) यांच्या तक्रारीवरून एका महिलेसह सात जणांवर नोंदणी अधिनियम १९०८ च्या कलम ८३ अंतर्गत तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार २५ एप्रिल २०२५ रोजी ग्राम नागरा येथील गट क्रमांक ४४५/२ (०.०६ हेक्टर) शेतजमिनीची नोंदणी करण्यात आली होती. या व्यवहारात इंदुबाई अशोक कोडवाणी यांच्या नावाने जमीन विक्री दाखविण्यात आली होती.
Banavat Land Registry Peper मात्र, तपासादरम्यान संबंधित महिलेचा २७ मार्च २०२२ रोजीच मृत्यू झाल्याचे उघड झाले. नगर परिषद व उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कागदपत्रांच्या पडताळणीत ही बाब स्पष्ट झाली. यानंतर राजस्व अपील क्रमांक ९२ / आरटीएस / ६४ / २५ अंतर्गत सुनावणी घेऊन संबंधित फेरफार क्रमांक ५०६७ रद्द करण्यात आला. या व्यवहारात आरोपींनी बनावट महिला उभी करून खोटा कबुलीजबाब देत ओळखपत्रांच्या आधारे दस्त नोंदणी पूर्ण केली. साक्षीदार व ओळखदार म्हणून काही व्यक्तींचा सहभागही आढळून आला आहे. या प्रकरणात तब्बल १७ लाख ७० हजार रुपयांचा व्यवहार करण्यात आला होता. या प्रकरणी विशाल माधव खंडेलवाल, महेंद्र तुलाराम धांडे, रंजित तुकाराम मेश्राम, रूपेश रमेश कुथे, भांगेद्र महागुलाल पंचबुते, अनिल श्रीराम मेश्राम तसेच एका अज्ञात महिला आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१९ (२), ३३६ (३), ३४० (२), ३३९, ६१ (२), ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल डोंगरवार करीत आहेत.