महाराष्ट्रातील संस्कृतिसंघर्ष

    दिनांक :29-Mar-2026
Total Views |
culture clash ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ प्रतिभावंत संवेदनशील समाजसुधारक साने गुरुजी यांच्या मानवतेचे अध्यात्म सांगणाऱ्या या काव्याच्या ओळी ओठावर खेळवत महाराष्ट्राच्या अनेक पिढ्या सुसंस्कारित झाल्या. महाराष्ट्र धर्माची पताका फडकवत ठेवणाऱ्या संस्कारांची शिदोरी या शिकवणुकीने मनामनाच्या झोळीत जमा झाली. काळ कसा बदलत जातो पाहा. आता या ओळी गुणगुणताना, खरा तो हा शब्द उच्चारल्यानंतर, कोणा खराताची आठवण व्हावी आणि बदलत्या काळासोबत सुरू झालेल्या संस्कृतीच्या ऱ्हासाने मने खंतावत जावीत असे काहीसे चित्र आता दिसू लागले आहे. महाराष्ट्राच्या समाजजीवनाची काही वैशिष्ट्ये आहेत. या समाजजीवनात दोन संस्कृतींचा सुंदर मिलाफ झालेला दिसतो. यापैकी एक संस्कृती अध्यात्माची आहे, तर दुसरी संस्कृती मनोरंजनाची आहे. एकाच समाजजीवनातील या दोन संस्कृतींचे प्रवाह समंजसपणे हातात हात घालून पिढ्यापिढ्यांपासून वाहत आले, पण त्यामध्ये कधीही संघर्ष झाला नाही. ज्या अभिमानाने महाराष्ट्र अध्यात्म संस्कृतीचा उल्लेख टाळ संस्कृती असा करतो, त्याच अभिमानाने महाराष्ट्राच्या लोककलांना आश्रय देऊन त्यांचा आदर करणाऱ्या चाळ संस्कृतीचा उल्लेखही केला जातो. सकाळी, सणासुदीच्या दिवसांत आणि धार्मिक वातावरणात ज्या श्रद्धेने महाराष्ट्राच्या गावोगावीच्या मंदिरांत घुमणारे टाळ चिपळ्यांचे नाद आध्यात्मिकतेची साक्ष देतात, त्याच गावात, संध्याकाळच्या समयी एखाद्या जत्रेत रंगणाऱ्या फडात घुमणाऱ्या चाळ-घुंगरांचा नाद राज्याच्या लोकसंस्कृतीची साक्ष देतात.
 
 

महाराष्ट्रातील संस्कृतिसंघर्ष 
 
 
मात्र, हातात हात घालून एकमेकांसोबत चालणाऱ्या या दोनही संस्कृतींचा कधीही संघर्ष झाला नाही. या दोन्ही संस्कृतींनी एकमेकांचा आदर केला आणि त्या संस्कृतीच्या साधकांनी दोनही संस्कृतींची पालखी आलटून पालटून खांद्यावर वाहत पुढच्या पिढ्यांच्या हाती सोपविली. आता काळ बदलला. संस्कृतिसंगमाचा हा संस्कार संपुष्टात येत चालला असून संस्कृतिसंघर्षाचा काळ सुरू झाल्याचे चित्र महाराष्ट्राला काहीसे विषण्ण करणारे ठरू पाहत आहे. महाराष्ट्राच्या या संस्कृतिसंगमालाच, महाराष्ट्र धर्म म्हणून कौतुकाने म्हटले जात होते. आजही अनेकांच्या मुखातून महाराष्ट्र धर्माचा गजर होत असतो. महाराष्ट्र धर्म जपण्याची गरजही वारंवार व्यक्त होत असते. पण वर्तमानात जे काही पाहावयास मिळते, ते म्हणजे महाराष्ट्र धर्म नाही, याची जाणीव त्रासदायक आहे. खरा तो एकच धर्म असे म्हटल्यावर कोणा खराताच्या नवउद्योगांचे चित्र नजरेसमोर यावे, या एकाच बाबीतून ही उद्वेगजनक वस्तुस्थिती आता महाराष्ट्र अनुभवत आहे. ही स्थिती म्हणजे, एक प्रकारे महाराष्ट्रातील संस्कृतिसंघर्ष आहे. हे सांस्कृतिक परिवर्तन नव्हे, तर संस्कृतीच्या विनाशाची वाटचाल ठरणार आहे. परिवर्तनाच्या प्रक्रियेत जुन्या गोष्टी नव्या तेजाने अधिकाधिक उजळ होत असतात. असे परिवर्तन त्या गोष्टींचे गुण अधिक समृद्धही करत असतात. नव्या संस्कृतिसंघर्षात दिसणारे परिवर्तन ओंगळवाणे आहे. बदलाची ही प्रक्रिया समाजजीवनाचे संस्कार उजळणारी नव्हे, तर काळवंडून टाकणारी आहे. म्हणून, खरातसारख्या प्रकरणांबाबत समाजाने सजग असावयास हवे. महाराष्ट्र धर्मास काळिमा फासणाऱ्या अशा प्रवृत्ती ही एक सामाजिक विषवल्ली आहे. अशा विषवल्ली वेळीच ठेचून काढल्या पाहिजेत, असे मत यापूर्वी अनेकदा महाराष्ट्राच्या कायदेमंडळात उभय बाजूंनी व्यक्त केले जात होते. आजही त्याबाबत दुमत दिसत नाही. तरीही, कायदेमंडळाच्या घुमटाखालीदेखील विषवल्लींचा शिरकाव होण्याच्या भीतीचे संकेत देणाèया काही घटना घडताना दिसतात, तेव्हा विषवल्ली ठेचण्याचे काम सोपे नाही, ते एक आव्हान आहे आणि ते सामूहिकरीत्या, एकत्रितपणे आणि निर्धारपूर्वकच पार पाडले पाहिजे, ही बाब अधोरेखित होते.
 
महाराषष्ट्राच्या विधिमंडळातील अर्थसंकल्पीय अधिवेशनातील कामकाजाच्या अखेरच्या आठवड्यावर याच संस्कृतिसंघर्षाच्या चिंतेचे सावट दाटले होते. चमत्कार, बुवाबाजीच्या नावाने समाजाला वेठीस धरणाऱ्या, महिलांच्या मानसिक किंवा अन्य कोणत्याही अपरिहार्यतेचा गैरफायदा घेत आपल्या विकृत कामना पूर्ण करून धनाच्या राशी गोळा करणाऱ्या कोणा कॅप्टन खरात नावाच्या एका भोंदूने आध्यात्मिकतेचा आव आणत समाजाच्या श्रद्धांना वेठीस धरले आणि महाराष्ट्र धर्माची परंपरा एका परीने पुरती लयास गेली. असे प्रकार याआधीही महाराष्ट्रात घडले आहेत आणि ते उघडकीस आल्यानंतर प्रत्येक वेळी महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि संस्कारांच्या इतिहासाचे पाढे वाचले गेले आहेत. अशा प्रकारांनी यावरच घाला घातल्याची चिंता व्यक्त झाली आहे आणि काळ पुढे सरकताच, त्या गोष्टी इतिहासजमा होऊन त्याच्याच पुनरावृत्तीची आठवण करून देणाèया नव्या गोष्टी घडत गेल्या आहेत. अशा घटनांच्या इतिसाहात डोकावून पाहिले, तर खरात नावाच्या भोंदूने महाराष्ट्राला दिलेला सांस्कृतिक धक्का ही एका परीने त्याच इतिहासाची पुनरावृत्ती ठरेल.
 
म्हणूनच, महाराष्ट्राच्या विधिमंडळात कामकाजाच्या अखेरच्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच मुद्यावरील एका चर्चेवरील उत्तरात व्यक्त केलेल्या भावना हे या संस्कृतिसंघर्षाच्या संकेतांची चिंता व्यक्त करणारे ठरले. कारण, व्यक्ती किंवा समाजाचे चारित्र्य हीच जेव्हा सापेक्ष आणि संशोधनाची बाब ठरते, तेव्हा कोणास चारित्र्यवान ठरवावे वा कोणास चारित्र्यहीन ठरवावे याचाच संभ्रम वाढण्याची आणि कालपरवापर्यंत अनैतिक मानल्या जाणाऱ्या एखाद्या धंद्यांवरही चारित्र्याचा मुलामा चढविण्याची चढाओढ सुरू होणे हा शहाजोगपणा ठरण्याचीच शक्यता अधिक! मुळात चारित्र्याच्या संकल्पनाच व्यक्ती, समूहाच्या विचार-संस्कारांनुसार वेगवेगळ्या असतात. चारित्र्याच्या परंपरागत समजुतींनुसार, ज्या ठिकाणी चारित्र्यवान व्यक्ती असणे अपेक्षित असते, तेथे बसणाèयांकडून अनेकदा अपेक्षाभंगाचेच दुःख पदरी पडल्याचा अनुभव येत असतो. मंदिराचे पुजारी भाविकांची हत्या करतात आणि मंदिरांच्या आवारात, मूर्तींच्या पायाशी मृतदेहांची विल्हेवाट लावतात अशा बातम्या जेव्हा कानावर आदळतात, तेव्हा चारित्र्यवान कोणास ठरवावे हा प्रश्न पडून संभ्रमच वाढत असतो. लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन अध्यात्माच्या नावावर दुकाने सुरू करून संस्कृती नासविणारे उद्योग सुरू केले जातात, तेव्हा, ज्या संकल्पनेबाबतचा संभ्रमच अधिक बळावतो. आता तसेच होऊ लागले असल्याने, संस्कृतिसंघर्षाची ही चिंता अधिकच बळावली आहे. म्हणूनच, मुख्यमंत्र्यांच्या त्या भाषणाची नोंद समाजमनात व्हावयास हवी. 
 
गेल्या आठवडाभरात विधिमंडळात खरात प्रकरणाचे वेगवेगळे पडसाद उमटले. अनेक सदस्यांनी चिंता व्यक्त केली. या प्रकरणात दिवसागणिक समोर येणारी माहिती नवनवे धक्के देणारी माहिती समोर येत आहे. 25 मार्च रोजी त्यावर सविस्तर निवेदन करताना मुख्यमंत्र्यांनीही महाराष्ट्र धर्माचा पुनरुच्चार केला. महाराष्ट्राला समासुधारक, संतांची मोठी परंपरा लाभली आहे. या संतांनी अंधश्रद्धांवर कठोर प्रहार केले आहेत याचे अनेक दाखलेही मुख्यमंत्र्यांनी दिले. खरात प्रकरणाची संपूर्ण पाळेमुळे खणून काढून या व्यक्तीला आणि अशा प्रवृत्तींना कायमची जरब बसेल अशी कारवाई केली जाईल, अशी निःसंदिग्ध ग्वाही त्यांनी दिलीच, पण राज्यात जे काही घडते आहे, ते पाहता आपण कोठे जात आहोत याचा विचार करण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत त्यांनी बदलत्या सामाजिक परिस्थितिविषयी चिंतादेखील व्यक्त केली. महाराष्ट्र ही सश्रद्ध समाजाची भूमी आहे. पण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधील सूक्ष्म भेदरेषा ओळखली पाहिजे. ती लक्षात आली नाही तर काय स्थिती होते हे खरात प्रकरणातून उघड झाले आहे. एक प्रकारे अंधश्रद्धेमुळे विवेकाचे भान कसे हरवते हे या प्रकरणातून दिसून आले आहे. आपल्या संतपरंपरेने ईश्वराचे अस्तित्व नाकारलेले नाही, तर अंधश्रद्धेवर प्रहार केले. ज्ञानेश्वर माउलींनी विश्वबंधुत्वाचा संदेश दिला, अंधश्रद्धेचा अंधकार नष्ट व्हावा अशी प्रार्थना पसायदानातून केली. तुकोबारायांनी साधूंची लक्षणे दाखवून दिली.
 
आजच्या परिस्थितीत ही संतांची शिकवण महत्त्वाची आहे. खरात प्रकरणातून सरकार आणि समाजासाठी नवी शिकवण मिळाली आहे. महाराष्ट्र धर्म टिकविण्यासाठी, वाढविण्यासाठी अंधश्रद्धा, भोंदूगिरीला स्थान मिळू देऊ नये यासाठी प्रयत्न करण्याची गरजही त्यांनी यावेळी अधोरेखित केली. सध्याच्या फोफावत्या विकृतींच्या संकटात असा सजगपणा दाखविण्यासाठी सरकार आणि समाजाच्याही सावधगिरीची गरज आहे. अन्यथा, ज्यास महाराष्ट्र धर्म म्हटले जाते, ती संस्कृती भविष्यात शोधावी लागेल. सज्ञान व्यक्तीस स्वयंआचरणाचे स्वातंत्र्य असल्याने व त्या स्वातंत्र्याचा त्याने विवेकाने वापर करावा असेच गृहीतच असल्याने विकृतांचे चाळे सुरू झाले तरी समाजाच्या झुंडी तिकडे वळाव्यात असे अजिबातच कोणासही अपेक्षित नसणार. उलट, अशा परिस्थितीत, समंजस समाजाने व व्यक्तींनी नेमका विचार करण्याची गरज अधोरेखित होते.culture clash म्हणजे, समजा, एकाच गल्लीत एखादे प्रार्थनास्थळ आहे आणि त्याच्याच शेजारी डान्सबार आहे, तर कोठे जाण्यात आपले हित आहे आणि कोठे जाण्याने आपल्यासह आपल्या कुटुंबीयांसही मनस्ताप होणार आहे, एवढा सारासार विचार करून निर्णय घेण्याची मुभा प्रत्येकाला आहे. अखेर, आपल्या व्यक्तिगत आयुष्याची घडी बिघडवायची की, सांभाळायची हे ठरविण्याएवढा विवेक प्रत्येकासच असतो. तसा विवेक न बाळगल्यास त्याचे परिणाम आपणास भोगावे लागतात, हे प्रत्येकासच स्वच्छपणे अनुभवता येत असते. या प्रकरणातून समोर येणारे नवनवे वास्तवही असेच अनुभव समाजासमोर ठेवणार आहे.
 
राजकारणात काही शब्द असे असतात, जे काळानुसार अधिक गाजतात; पण त्यांचा अर्थ मात्र धूसर होत जातो. ‘‘महाराष्ट्र धर्म’’ हा तसाच एक शब्द ठरू पाहात आहे. सत्ताधारी किंवा विरोधकांकडून वेगवेगळ्या प्रसंगी हा शब्द अभिमानाने उच्चारला जातो. परंतु, या शब्दामागील मूल्यांचा आजच्या वास्तवाशी किती संबंध उरला आहे, हा प्रश्न आजच्या काळातील वास्तवाकडे पाहताना अधिक महत्त्वाचा ठरतो. मुळात, ‘‘महाराष्ट्र धर्म’’ ही संकल्पना केवळ धार्मिक नव्हती. ती राज्यकारभारातील नैतिकतेची आणि समाजजीवनातील समतेची होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याच्या संकल्पनेत, ‘धर्मसंकल्पने’त कर्तव्य, न्याय आणि प्रजाहिताच्या जबाबदारीची जाणीव अधोरेखित झालेली होती. ‘हिंदवी स्वराज्य’ ही कल्पना कोणत्याही एका धर्माची नव्हे, तर सर्वसामान्यांच्या सन्मानाची होती, तसाच ‘महाराष्ट्र धर्म’ हा शब्द समावेशक आणि प्रगतिशील होता. हीच परंपरा पुढे संतसाहित्यात अधिक दृढ झाली. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या विचारांतून समाजाला समतेचा, सहिष्णुतेचा आणि मानवतेचा संदेश मिळाला. जात-पात, उच्च-नीच यांच्या पलीकडे जाऊन ‘माणूस’ हीच खरी ओळख आहे, हा विचार महाराष्ट्राच्या संस्कृतीचा गाभा ठरला. पुढे महात्मा जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्यायाच्या लढ्यातून या ‘महाराष्ट्र धर्मा’ला आधुनिक अर्थ दिला. आजकाल मात्र, हा शब्द अनेकदा भावनिक आवाहनापुरताच संकुचित होत असावा असे दिसते. यामुळे या शब्दाच्या मूळ संकल्पनेचा गाभाच हरवेल की काय, अशी भीतीही व्यक्त होते. कारण, महाराष्ट्र धर्म या संकल्पनेत महाराष्ट्राच्या संस्कृतिसंगमाचा इतिहास आहे.
हा शब्द या परंपरा आणि संस्कृतीचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प ठरला पाहिजे. आजच्या वास्तवाचे चित्र मात्र, काहीसे संमिश्र दिसते. एका बाजूला महाराष्ट्र औद्योगिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात देशात आघाडीवर आहे. विविधतेला स्वीकारण्याची परंपरा अजूनही टिकून आहे. परंतु दुसèया बाजूला, जातीय तणाव, ग्रामीण-शहरी दरी, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी आणि राजकीय ध्रुवीकरण या समस्या ठळकपणे दिसतात. समाजजीवनातील पारदर्शकतेचा अभाव आणि शासन, प्रशासनातील सुशासनाचा अभाव, अंधश्रद्धा, काळी जादू आदींचा सुळसुळाट आणि थेट शासकांच्या शयनगृहापर्यंत पोहोचलेल्या अनैतिकतेच्या व्यवहारांचे आरोप यामुळे जनतेचा परस्परांवरील विश्वासही डळमळीत होताना दिसतो. बुवाबाजी किंवा भोंदूगिरीसारखे संस्कृतीला आव्हान देणारे धंदे कधीच एकट्या व्यक्तीच्या जोरावर उभे राहत नाहीत. त्यामागे अनेक अदृश्य शक्तींच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संरक्षणाचे कवच असते. या संरक्षणामुळेच, बुवाबाजी हा केवळ आध्यात्मिक क्षेत्रास विळखा घालणारा उद्योग राहिलेला नाही. तो एक संघटित, आखणीबद्ध पद्धतीने चालविणारा जाणारा, सत्ता, संपत्ती यांच्या जोरावर समाजावर वर्चस्व गाजविणारा कॉर्पोरेट धंदा बनू पाहत आहे. अशा परिस्थितीत, ‘महाराष्ट्र धर्म’ हा शब्द केवळ घोषणांपुरता मर्यादित राहता कामा नये. तो आचरणात आला पाहिजे, अशी भावना बळावत जाते. समाजात विषमता वाढत असेल, दुर्बल घटकांना न्याय मिळत नसेल, सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा कमी होत असेल आणि श्रद्धा आणि अंधश्रद्धांमधील सूक्ष्म भेदरेषेच्या काठावरच्या सामान्यांचे धर्म, भक्तीच्या नावावर पिळवणूक, शोषण होत असेल, तर ‘महाराष्ट्र धर्म’ हा शब्द केवळ प्रतीकात्मक उरतो. हा शब्द म्हणजे महाराष्ट्राच्या अभिमानाचा विषय ठरावा, यासाठी तो केवळ इतिहासाचा वारसा म्हणून नव्हे, तर वर्तमानातील कृतीतून जपला गेला पाहिजे. समाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवले पाहिजे, समाजाने परंपरेने जतन केलेली समतेची सांस्कृतिक मूल्ये प्रत्यक्षात आणली पाहिजेत. शिक्षण, सामाजिक न्याय आणि आर्थिक संधी यामध्ये सर्वसमावेशकता निर्माण झाली, तरच महाराष्ट्र धर्म खèया अर्थाने जिवंत राहील. अन्यथा, तो इतिहासाच्या गौरवगाथेतला एक सुंदर पण अपूर्ण अध्याय ठरेल.