राज्यात ४१२ शाळा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ होणार

    दिनांक :29-Mar-2026
Total Views |
शिक्षण क्षेत्रात मोठा बदल घडविण्याचा डॉ. भोयर यांचा निर्धार
 
वर्धा, 
'Dr. Babasaheb Ambedkar adarsh sala' राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून राज्यातील ४१२ शाळांचा ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळे सरकारी शाळांचा दर्जा उंचावून त्या खाजगी शाळांशी स्पर्धा करू शकतील, असा विश्वास व्यत केला जात आहे.
 
 
school dksl
 (संग्रहित छायाचित्र )
 
'Dr. Babasaheb Ambedkar adarsh sala' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनत राज्य सरकारने १५०० शाळांना आदर्श शाळांमध्ये रूपांतरित करण्याचा व्यापक निर्णय घेतला असून, त्यातील पहिल्या टप्प्यात ४१२ शाळांची निवड करण्यात आली आहे. या शाळांमध्ये समूह साधन केंद्र शाळा, पीएम श्री शाळा आणि विद्यानिकेतन शाळांचा समावेश राहणार आहे. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना अखंड आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी सरकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये दहावीपर्यंत वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच, आदर्श शाळांमध्ये सर्व आवश्यक भौतिक व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यासाठी निधीचीही तरतूद करण्यात आली आहे. या शाळांच्या विकासाची जबाबदारी जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांवर सोपविण्यात आली आहे. त्यांनी सविस्तर आराखडा तयार करून शिक्षण आयुतांची मान्यता घेणे आवश्यक राहणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देताना मुलींसाठी विशेष सुविधा देण्यावरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. इयत्ता सातवी ते बारावीतील मुलींसाठी ‘पिंक रूम’च्या माध्यमातून मासिक पाळीदरम्यान विश्रांतीची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय, स्वच्छतागृह, स्वच्छ पिण्याचे पाणी आणि आरोग्यदायी वातावरण यासारख्या मूलभूत सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आदर्श शाळांमधूनच प्रत्येक जिल्ह्यात एक शाळा क्रीडा प्रबोधिनी म्हणून घोषित केल्या जाणार आहे. ज्यामुळे क्रीडा क्षेत्रात देखील राज्याचे पाऊल पुढे पडणार आहे. शालेय शिक्षण क्षेत्रात गुणवत्तावाढ आणि सरकारी शाळांवरील विश्वास दृढ करण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकारामुळे राज्यातील शिक्षण व्यवस्थेला नवी दिशा मिळणार असल्याचे मानले जात आहे.
 
जिल्हानिहाय आदर्श शाळा
ग्रामीण व शहरी भागातील मुलांना चांगले व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी राज्य शासनाने सर्वंकष प्रयत्न सुरू केले आहे. याच प्रयत्नातून राज्यातील ४१२ शाळा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा म्हणून विकासित केल्या जाणार आहे. यात पुणे येथील २५, नागपूर ११, संभाजीनगर १५, जळगाव २२, रायगड १३, अहिल्यानगर १८, सातारा २१, रत्नागिरी ८, सिंधूदुर्ग ३, अमरावती ११, कोल्हापूर १७, गडचिरोली ६, वर्धा १७, चंद्रपूर १२, यवतमाळ १२, धुळे १०, नांदेड १८, जालना ११, पालघर १२, नंदूरबार ६, नाशिक ३८, बुलढाणा १४, लातूर १०, सांगली १०, अकोला ४, वाशिम ४, गोंदिया ८, हिंगोली ६, सोलापूर १३, ठाणे ९, बीड ११, धाराशिव ७, भंडारा ६ आणि परभणी येथील ४ शाळांचा समावेश आहे.