- शहीद जान्या तिम्या जि.प. हायस्कूलच्या प्राचार्यावर कारवाईची मागणी
- सोमवारी शाळेला कुलूप ठोकण्याच्या पालकांचा इशारा
गोंदिया,
Goregaon: School closure protest गोरेगाव येथील शहीद जान्या तिम्या जिल्हा परिषद विद्यालय हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सध्या गंभीर वादाच्या भोवऱ्यात सापडले असून येथील प्राचार्य पी. आर. लोंढे यांच्यावर आर्थिक व्यवहारात मोठ्या प्रमाणात घोळ केल्याचे आरोप पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरापासून सातत्याने तक्रारी, निवेदने आणि आंदोलने करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने पालक व नागरिकांचा संताप आता शिगेला पोहोचला आहे. दरम्यान, संबंधित प्राचार्यावर कारवाई होत नसल्याने पालकांनी आता महाविद्यालयालाच कुलूप लावण्याचा निर्धार केला असून सोमवारी ३० मार्च रोजी शाळा बंदचा इशारा दिला आहे.
Goregaon: School closure protest पालकांनी दिलेल्या माहितीनुसार प्राचार्य लोंढे यांनी महाविद्यालयात आर्थिक घोटाळा केला असून या संदर्भात त्यांनी अनेकदा वरिष्ठांकडे तक्रार नोंदवली आहे. ज्यामध्ये २९ एप्रिल २०२५ रोजी प्रथम तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर १० जुलै २०२५ व १५ जुलै २०२५ रोजीही आर्थिक गैरव्यवहाराबाबत स्वतंत्र अर्ज सादर करण्यात आले. विशेष म्हणजे, १२ जुलै २०२५ रोजी झालेल्या पालक सभेत ठराव मंजूर करून संबंधित प्राचार्यावर कारवाईची मागणी करण्यात आली होती. पुढे २१ नोव्हेंबर २०२५ रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊनही प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, या सर्व प्रयत्नांनंतरही कारवाई करण्यात आली नसल्याने ३० डिसेंबर २०२५ रोजी शाळा व्यवस्थापन समिती, पालक व नागरिकांच्या उपस्थितीत शाळाबंद आंदोलन छेडण्यात आले होते. त्यावेळी जिल्हा परिषद पदाधिकारी व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः उपस्थित राहून १५ दिवसांत चौकशी पूर्ण करून संबंधितांवर कारवाई करण्याचे ठोस आश्वासन दिले होते. परंतू या आश्वासनाला आज तब्बल तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही कोणतीही कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. “हे आश्वासन होते की केवळ वेळकाढूपणा?” असा संतप्त सवाल आता पालक वर्गातून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता पालक व नागरिकांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत सोमवारी ३० मार्च रोजी सकाळी ७.३० वाजल्यापासून महाविद्यालयाला कुलूप लावून महाविद्यालय पूर्णतः बंद करण्याचा इशारा दिला आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान...
या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर पालक, नागरिक, शाळा समिती व व्यवस्थापन समितीचे सदस्य सहभागी होणार असून परिस्थिती चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, सततच्या तक्रारी, आंदोलने आणि आश्वासनांच्या पोकळ घोषणांमुळे आता शिक्षण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य, शाळेची प्रतिमा आणि प्रशासनाची विश्वासार्हता या तिन्ही गोष्टींचा कस लागलेला असताना, आता प्रशासन खरोखरच जागे होणार का, की पुन्हा एकदा आश्वासनांचा खेळ सुरू राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र या सर्व प्रकारात ऐन परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.