संतप्त नागरिकांकडून इंझापूर कचरा डेपोला लावले कुलूप

    दिनांक :29-Mar-2026
Total Views |
दुर्गंधीमुळे आरोग्य धोयात
 
वर्धा, 
Injapur garbage depot locked इंझापूर परिसरात स्थानिक नगरपालिकेच्या मालकीचा कचरा डेपो आहे. या ठिकाणी वर्धा शहरासह परिसरातील सुमारे १२ गावातील कचरा साठविला जातो. शिवाय कचर्‍यापासून खताची निर्मितीही होते. पण साठविलेल्या कचर्‍याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून कचरा डेपो हटवा किंवा नागरिकांचे पुनर्वसन करा, अशी मागणी रेटत संतप्त नागरिकांनी थेट कचरा डेपोलाच कुलूप ठोकले.
 
 
kachara
 
इंझापूर येथील कचरा डेपोत वर्धा शहरासह परिसरातील बारा गावांचा कचरा साठविला जातो. मात्र, कचर्‍याची योग्य विल्हेवाट लावल्या जात नसल्याने नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. कचरा जळला किंवा जाळल्या गेल्यास मानवाच्या शरीरावर विपरित परिणाम करणार्‍या धुराचाही त्रास नागरिकांना सोसावा लागतो. कचरा डेपोमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने या प्रकरणी ठोस कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन अधिकार्‍यांना वारंवार देण्यात आले. पण, त्यांच्याकडूनही दुर्लक्ष केल्या जात असल्याचा आरोप नागरिकांनी आंदोलनादरम्यान केला. यादरम्यान आंदोलनकर्त्यांनी घर व व्यावसायिक प्रतिष्ठानातून ओला व सुका कचरा गोळा करून तो कचरा डेपोत टाकल्या जाणार्‍या घंटागाड्यांना कचरा डेपोच्या प्रवेशद्वारासमोर अडविले. त्यामुळे कचरा डेपोच्या प्रवेशद्वारावर कचरा संकलन करणार्‍या घंटागाड्यांची रांग लागली होती. कचरा डेपो हटवा किंवा इंझापूर गावाचे पुनर्वसन करा, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी रेटली.
 
 
Injapur garbage depot locked  आंदोलनाची माहिती मिळताच नप मुख्याधिकारी देशमुख, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, तहसीलदार संदीप पुंडकर आणि बीडीओ यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. मात्र, चर्चेतून मार्ग निघाला नाही. अखेर संतप्त नागरिकांनी अधिकार्‍यांसमोरच कचरा डेपोला कुलूप ठोकले. दरम्यान, या समस्येवर सोमवार ३० रोजी जिल्हाधिकार्‍यांनी त्यांच्या दालनात नगरपालिका पदाधिकारी व अधिकारी, तहसीलदार आणि बीडीओ यांची बैठक बोलावली असून या बैठकीत कोणता निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे.