तेहरान,
Iran US War : मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षादरम्यान इराणने अमेरिकेच्या अत्याधुनिक E-3 सेंट्री (AWACS) विमानाला लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. या दाव्याला आता काही प्रमाणात पुष्टी मिळाल्याचे वृत्त समोर आले असून, सौदी अरेबियातील प्रिन्स सुलतान एअरबेसवर या विमानाचे अवशेष आढळल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इराणने क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे अमेरिकन तळावर हल्ला केला होता. या हल्ल्यात काही अमेरिकन लष्करी विमाने नुकसानग्रस्त झाली, ज्यामध्ये E-3 सेंट्रीसारख्या महत्त्वाच्या विमानाचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
E-3 सेंट्री हे अमेरिकेचे अत्यंत महत्त्वाचे हवाई इशारा आणि नियंत्रण प्रणाली (AWACS) विमान मानले जाते. हे विमान शेकडो किलोमीटर दूरपर्यंत शत्रूची हालचाल ओळखून युद्ध नियंत्रणात मदत करते. त्यामुळे या विमानाला झालेलं नुकसान अमेरिकेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
या हल्ल्यात काही अमेरिकन सैनिक जखमी झाल्याची माहितीही समोर आली आहे. दरम्यान, इराण-अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे संपूर्ण मध्यपूर्वेत तणाव प्रचंड वाढला असून, पुढील काळात परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.