जनसंघर्ष अर्बन निधी बँकेचे साहित्य जप्त

    दिनांक :29-Mar-2026
Total Views |
मानोरा येथील शाखेत १ कोटी ५३ लाखांची ठेवी
 
मानोरा,
Jansangharsh Urban Nidhi Bank अनेक दिवसापासून बंद असलेल्या शहरातील वादग्रस्त जनसंघर्ष अर्बन निधी शाखेतील साहित्य न्यायालयाच्या आदेशानुसार पांढरकवडा उपविभागीय पोलिस अधिकारी रॉबिन बॅन्सल यांचे मार्गदर्शनात पोलिस कर्मचार्‍यांनी २८ मार्च रोजी ताब्यात घेऊन दिग्रस पोलिस स्टेशनला जमा केले.

bank
(संग्रहित छायाचित्र )
Jansangharsh Urban Nidhi Bank मानोरा शहरात प्रणित मोरे यांनी खातेदार, ग्राहकांना ज्यादा व्याजासह विविध प्रलोभने दाखवून एजंटाच्या माध्यमातून १ कोटी ५३ लाख रुपयांच्या ठेवी जमा केल्या होत्या. मात्र, अचानक मानोरा येथील जनसंघर्ष अर्बन शाखा बंद पडल्याने शाखेमध्ये पैसे जमा केलेल्या खातेदारांची झोप उडाली होती. त्यावेळी दिग्रस पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाल्याने यवतमाळ येथील गुन्हे शाखेच्या पथकाने २७ डिसेंबर २०२४ रोजी रात्री बँकेची शाखा सील केली होती. जनसंघर्ष अर्बन निधी शाखेत घोटाळा केल्याप्रकरणी मुख्य सुत्रधार प्रणित मोरे यांच्यासह त्यांचे साथीदार आरोपी कारागृहात बंद आहेत. अद्यापही जनसंघर्ष अर्बन निधी शाखेत ठेवी जमा केलेले ग्राहक आपल्या जमापुंजी मिळविण्यासाठी न्यायालयीन लढा लढत आहेत. २८ मार्च रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी पांढरकवडाचे एक पथक रायटर रवी शिंदे, महेश नाईक व दिग्रस पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक राजेश लाखकर यांनी मानोरा येथील जनसंघर्ष अर्बन निधी शाखे मधील संपूर्ण सामान फर्निचर, संगणक, लॅपटॉप, सीपीओ न्यायालयाच्या आदेशानुसार ताब्यात घेऊन गेले आहे. यावेळी शाखेचे मॅनेजर कृष्णा रणखांब, कर्मचारी गौतम बरडे, अजिंक्य इंगोले, प्रतीक काडदाते, पिग्मी एजंट गिरीश तापडिया, शाखा इमारतीचे मालक स्वप्नील ठाकरे, राम राऊत आदी उपस्थित होते. जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेडच्या यवतमाळ जिल्ह्यात ५ व वाशीम जिल्ह्यात २ अशा सातही शाखा मिळून ६ हजार ग्राहक आहेत.