प्लॅस्टिक कचर्‍याचा तीर्थक्षेत्र पोहरादेवीला विळखा

    दिनांक :29-Mar-2026
Total Views |
स्वच्छतेची जागरूकता निर्माण करण्यात प्रशासन अपयशी
 
मानोरा, 
तालुक्यातील जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र Pohradevi Temple Mandir पोहरादेवीमध्ये प्लॅस्टिक कचर्‍याचा वेढा पडला आहे. श्रीराम नवमी निमित्त देशभरातून आलेल्या श्रद्धाळूंसाठी भरलेल्या यात्रेनंतर मंदिर परिसरात अधिक प्रमाणात प्लास्टिक कचरा जमा झाला आहे. हा कचरा तातडीने मार्गी लावण्याची गरज आहे.
 
 
Pohradevi Temple
 
तीर्थक्षेत्र Pohradevi Temple Mandir पोहरादेवी हे बंजारा समाजाचे प्रमुख धार्मिक स्थळ आहे. येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर यात्रा व उत्सव साजरे होतात. स्वच्छता अभियान राबवून तीर्थक्षेत्राची स्वच्छता राखणे आवश्यक असताना स्थानिक प्रशासनासह तालुका व जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्षित धोरणाचा फटका मंदिर परिसर व स्थानिक नागरिकांना सोसावा लागत आहे. तीर्थक्षेत्राच्या आसपास स्वच्छता जागरूकता अभियान राबविण्याकडे नेहमीच कानाडोळा केला जातो. तीर्थक्षेत्र आणि स्थानिक परिसरामध्ये ग्रामस्वच्छता वाढविण्यासाठी स्थानिक नागरिकांसह येणार्‍या श्रद्धाळूंमध्ये जनजागृती निर्माण करण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरत असल्याचेच येथे जमा झालेल्या मोठ्या प्रमाणातील घातक प्लास्टिक कचर्‍यावरून पुढे येत आहे. पोहरादेवी तीर्थक्षेत्र परिसर स्वच्छतेसाठी प्रशासनाकडून कुठलीही ठोस उपाययोजना राबविली जात नसल्याचेच या ठिकाणी जमा होणारा कचरा, मानवी विष्ठा आणि घाण त्याचे उदाहरण आहे. तीर्थक्षेत्राच्या आसपास प्लॅस्टिक कचर्‍याचे प्रदूषण होण्यासाठी स्थानिक ग्राम पंचायत प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने जनजागृती करण्याची आवश्यकता यानिमित्ताने अधोरेखित होत आहे. जगभरातून येणार्‍या भाविकांना मूलभूत सुविधा पुरविण्याच्या बाता मारणार्‍या प्रशासनाकडून प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापनासंदर्भात कुठलेच स्थायी धोरण अवलंबिले जात नसल्याचेही या निमित्याने वारंवार सिद्ध होत आहे.