नाशिक
Rupali Chakankar अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्यावर विशेष तपास पथकाने (एसआयटी) समन्स बजावल्याची माहिती विशेष सूत्रांनी दिली आहे. यामुळे या प्रकरणात भोंदू अशोक खरात व्यतिरिक्त पहिल्यांदा राजकीय व्यक्तीच्या चौकशीची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांना आधी महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावरूनही त्यांना राजीनामा द्यावा लागला
एसआयटीच्या समन्सानंतर, रुपाली चाकणकर यांना चौकशीसाठी हजर राहावे लागेल, असे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणात चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आणि त्यांना सहआरोपी बनवण्याची मागणी उद्धव ठाकरे सेनेच्या नेता सुषमा अंधारे आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली होती. त्यामुळे राज्य सरकारवर या प्रकरणात मोठा दबाव निर्माण झाला होता.
दरम्यान, शिवानिका संस्थेच्या Rupali Chakankar सर्व आजी-माजी सदस्यांची चौकशी होणार असल्याची माहितीही समोर आली आहे. एसआयटी या सर्व सदस्यांना चौकशीसाठी बोलवणार असून, संस्थेच्या सर्व व्यवहार सध्या तपासाच्या रडारवर आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, समन्स हा कोणताही धक्कादायक निर्णय नाही, तर चौकशी प्रक्रियेचा भाग आहे.याच दरम्यान, भोंदू अशोक खरात याला पोलीस उपायुक्त कार्यालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्याला नाशिकच्या सत्र न्यायालयात हजर केले गेले. खरातच्या मोबाईलचा फॉरेन्सिक अहवाल एसआयटीला मिळाल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यामुळे प्रकरणात अजून मोठा उलगडा होण्याची शक्यता आहे.पीडितेच्या वकिलांनी न्यायालयात म्हटले की, अशोक खरात सत्य सांगत नाही आणि या प्रकरणात अनेक कुटुंब उद्धवस्त झाले आहेत. तर, आरोपीच्या वकिलांनी त्याला पोलीस कोठडीची गरज नाही, असे म्हणत बचाव केला. आतापर्यंत अशोक खरातवर ११ गुन्हे दाखल झाले आहेत, त्यापैकी ९ लैंगिक शोषणाचे आहेत आणि २ फसवणुकीशी संबंधित आहेत.सर्व घटनांचा तपास सुरू असून, एसआयटीच्या चौकशीतून या प्रकरणातील सत्य उघड होण्याची अपेक्षा आहे. रुपाली चाकणकर यांच्यासह संस्थेतील इतर व्यक्तींविरोधात काय कारवाई होईल, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.