हिंगणघाटहून ४० भाविक रामलल्लाच्या दर्शनासाठी रवाना
हिंगणघाट,
ST Bus: Vidarbha to Ayodhya हिंदू हृदयसम्राट तीर्थाटन योजनेअंतर्गत विदर्भातून पहिल्यांदाच एसटी महामंडळाची लालपरी अयोध्या दर्शनासाठी प्रवाशांसह दाखल होणार आहे. हिंगणघाट एसटी आगारातून या विशेष बसचा शुभारंभ करण्यात आला असून, तालुयातील अल्लीपूर, सिरुड येथील भाविक हिंगणघाट येथून रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी शनिवारी दुपारी रवाना झाले.
या यात्रेचे नियोजन हिंगणघाट आगाराचे व्यवस्थापक गौतम शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. विशेष परमिटसह सात दिवसांच्या या धार्मिक प्रवासाची आखणी करण्यात आली असून हिंगणघाट परिसरातील अल्लीपूर, सिरुडसह परिसरातील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. महत्वाचे म्हणजे, या भाविकांत पुणे येथील रहिवासी असलेले एक दाम्पत्यसुद्धा सहभागी झाले आहे. शासनाच्या या उपक्रमामुळे कमी खर्चात धार्मिक पर्यटनाची संधी उपलब्ध झाली आहे.
ST Bus: Vidarbha to Ayodhya प्रवासादरम्यान, यावेळी प्रमुख तीर्थक्षेत्रांचे मय्यर, चित्रकूट, प्रयागराज, काशी दर्शन सुद्धा भाविकांना घडणार आहे. तसेच परतीच्या प्रवासात कोराडी देवी आणि नागपूर येथील स्वामीनारायण मंदिर दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे ही यात्रा अधिक समृद्ध व आध्यात्मिक ठरणार आहे. या बसचे चालक बाळू क्षीरसागर व मच्छिंद्र पिचड हे संपूर्ण प्रवासाची जबाबदारी पार पाडणार आहेत. यात्रेच्या प्रारंभी भाविकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र शासनाची ही योजना भाविकांसाठी अत्यंत लाभदायी ठरत असून, भविष्यात अशाप्रकारच्या आयोजनाची अपेक्षा व्यत केली जात आहे. एसटी संगे तीर्थाटन या विशेष मोहिमेसाठी वाहतूक निरीक्षक ममता सोनवने, सय्यद व इतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.