नियोजित बालविवाह थांबविण्यात यश

    दिनांक :29-Mar-2026
Total Views |
- दामिनी पथक, महिला व बाल विकास विभाग आणि इंडियन सोशल वेल्फेअर सोसायटीच्या पथकाची कारवाई

गोंदिया, 
Success in stopping child marriage तिरोडा येथे होऊ घातलेल्या बालविवाहाची गोपनीय माहिती मिळताच जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाइल्ड हेल्पलाइन, इंडियन सोशल वेल्फेअर सोसायटी गोंदिया तसेच दामिनी पथक यांच्या संयुक्त पथकाने तत्काळ कारवाई करून सदर बालविवाह रोखण्यात यश मिळविले आहे.
 
 
bal
 
Success in stopping child marriage  मिळालेल्या माहितीनुसार तिरोडा येथे बालविवाह होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली. या आधारे संबंधित पथकाकडून सदर मुलगा व मुलीचे जन्म प्रमाणपत्र तिरोडा नगरपरिषदेकडून प्राप्त करण्यात आले. त्यानुसार बालिकेचे वय बालविवाह प्रतिबंधक कायदा, २००६ नुसार विवाहासाठी अपुरे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पथकाने तिरोडा येथे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, नगरसेवक अनिकेत कटरे व वॉर्ड बाल संरक्षण समितीच्या सदस्यांची बैठक घेऊन नियोजित विवाहाबाबत माहिती देण्यात आली. यात ४ एप्रिल रोजी मंडप पूजन व हळदीचा कार्यक्रम, तर ५ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता विवाह होणार असल्याचे समजले. त्यानंतर दामिनी पथक, महिला व बाल विकास विभाग आणि इंडियन सोशल वेल्फेअर सोसायटीच्या टीमने नवरदेव-नवरी तसेच त्यांच्या पालक व नातेवाईकांशी चर्चा करून बालविवाहाचे कायदेशीर परिणाम आणि दुष्परिणाम समजावून सांगितले. वय पूर्ण होईपर्यंत विवाह न करण्याचे लेखी हमीपत्र पालक व संबंधितांकडून घेण्यात आले.‘बालविवाह मुक्त भारत’, ‘बालविवाह मुक्त महाराष्ट्र’ आणि ‘बालविवाह मुक्त गोंदिया’ या अभियानांतर्गत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाडे यांच्या नेतृत्वात ही कार्यवाही पार पडली. सामाजिक कार्यकर्त्या मनीषा चौधरी व दीपमाला भालेराव यांनी बालिकेचे समुपदेशन केले असता तिने पुढील शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली. बालिकेला बालकल्याण समिती, गोंदियासमोर सादर करून पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.