मुंबई
Super Duper मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘Super Duper’ या आगामी चित्रपटातील ‘कुकडू कू’ गाण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. गाणं प्रदर्शित होताच ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं असून विशेष लक्ष वेधून घेतलं आहे ते लहान गायक अंशुमन कैलास मोरे याच्या आवाजाने. पहिल्याच मोठ्या संधीमध्ये त्याने आपल्या सुरांनी अशी मोहिनी घातली की त्याचं नाव रसिकांच्या ओठांवर झळकू लागलं आहे.
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील विखरण या छोट्याशा गावातून अंशुमनचा प्रवास सुरू झाला. अत्यंत साध्या कुटुंबात वाढलेल्या अंशुमनचे आई-वडील शेतीकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सध्या तो सरस्वती माध्यमिक विद्यालयात आठवीत शिक्षण घेत असून, लहानपणापासूनच त्याला गाण्याची आवड आहे. घरची परिस्थिती कठीण असली तरी त्याने आपल्या कलेवरील प्रेम कायम ठेवत सातत्याने सराव केला. दोन लहान भावांसोबत वाढताना त्याने स्वतःच्या आवाजाला अधिकाधिक परिपक्व बनवलं.
अंशुमनचा संगीत प्रवास Super Duper यापूर्वीपासूनच सुरू असून अहिराणी भाषेत त्याने ‘चार वरिस ना प्यार’, ‘साजन तू बालम तू’, ‘सांग ना राणी’ आणि ‘कोना भरोसे सोडी गई’ यांसारखी ४० ते ५० गाणी गायली आहेत. ‘राजा मना तू राजा रे’ हे त्याचं गाणं विशेष लोकप्रिय ठरलं आहे. मात्र, ‘कुकडू कू’ या गाण्यामुळे त्याला खरी ओळख मिळाली असून हे गाणं त्याच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट मानलं जात आहे.
महाराष्ट्रभरातून झालेल्या निवड प्रक्रियेतून अंशुमनची निवड झाली होती. मिळालेल्या या संधीचं त्याने सोनं करत पहिल्याच प्रयत्नात प्रेक्षकांची मनं जिंकली. एवढ्या लहान वयात त्याच्या आवाजाची दखल संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीने घेतली आहे.
या संधीबद्दल बोलताना अंशुमनने सांगितले की, Zee Studios कडून मिळालेली ही संधी त्याच्यासाठी स्वप्नपूर्तीप्रमाणे आहे. मोठ्या कलाकार आणि दिग्दर्शकांसोबत काम करताना खूप काही शिकायला मिळालं. गावातून मुंबईपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता, मात्र कुटुंबाचा पाठिंबा कायम मिळाला. ‘कुकडू कू’ला मिळणारा प्रतिसाद पाहून तो आनंदी असून भविष्यातही चांगली गाणी गाण्याची इच्छा त्याने व्यक्त केली.
दरम्यान, ‘Super Duper’ हा कौटुंबिक मनोरंजनपट येत्या ३ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर आशा पाटील यांनी केले असून निर्माते विजय शिंदे आणि नरेश बोर्डे आहेत. तर छायांकनाची जबाबदारी संजय जाधव यांनी सांभाळली आहे. अंशुमनच्या आवाजामुळे चित्रपटाला एक वेगळीच ऊर्जा मिळाली असून, त्याच्या पुढील वाटचालीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.